वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

मुंबई, दि.31 : तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. हा उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत दि.30 डिसेंबर रोजी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा व मान्यवर लेखकांच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 1 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई येथे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालयातील वाचक यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके वाचन करण्याचा सामूहिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण व पुस्तक कथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट व सामूहिक ग्रंथ वाचन कार्यक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य कार्यशाळा, विद्यार्थी-लेखक परीसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत असून यामध्ये राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये याठिकाणीही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन वाचन संस्कृती वाढविण्यामध्ये योगदान द्यावे,असे आवाहन राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी केले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/ससं/