मुंबई, दि. 31 : वखार महामंडळ साठवणूक केलेल्या शेतमालाचा विमा उतरवून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये सवलत देते. ही सुविधा निश्चितच शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. शेतकरी हिताच्या सुविधा देणाऱ्या वखार महामंडळाने गोदामांचा विस्तार करून साठवणूक क्षमतेत वाढ करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या बैठकीमध्ये श्री. रावल आढावा घेताना बोलत होते.
बैठकीस महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाचे क्षेत्रीय प्रबंधक आप्पासाहेब धुळाज, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डूबे पाटील, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सह व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बारगावकर उपस्थित होते.
सध्या अस्तित्वात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात यावा. ज्या ठिकाणी गोदामांमध्ये शीतगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे, तिथे देण्यात यावी. राज्यात होत असलेल्या ड्राय पोर्टमध्ये प्राधान्याने गोदामांची निर्मिती करावी. शेतमालाच्या उत्पादकतेनुसार विशिष्ट शेतमाल साठवण्यासाठी ‘सायलो’ निर्मितीवर भर देण्यात यावा. रेल्वे मार्गाजवळ मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून गोदामांची निर्मिती करावी, अशाही सूचनाही श्री. रावल यांनी दिल्या.
पणन मंत्री श्री. रावल म्हणालेकी, भारतीय कापूस महामंडळाकडील रक्कम येण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यात मागणीनुसार व कापूस उत्पादनाच्या अंदाजानुसार सी.सी.आयकडे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून यासाठी निश्चितच पावले उचलण्यात येतील.
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या गोदामांची क्षमतेनुसार व परिस्थितीनुसार श्रेणीबद्धता करावी. यामध्ये सद्यस्थितीत उपयोगात असणारे, निर्लेखित करण्यात येणारे यांची श्रेणी करावी. सोयाबीन खरेदीमध्ये फेडरेशनने आपला सहभाग वाढवावा. बारदाण्याअभावी कुठल्याही परिस्थितीत खरेदी रखडू नये, याची काळजी घ्यावी. बारदाणा उपलब्धतेसाठी सातत्याने प्रयत्न करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. रावल यांनी दिल्या.
राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी
राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पुढील काही दिवसात पूर्ण करावी, अशा सूचना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिल्या.
बैठकीस विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर, उपसचिव श्री हांडे, कक्ष अधिकारी श्री. साखरे उपस्थित होते.
पणन मंत्री श्री. रावल यांनी राजशिष्टाचार विभागातील आकृतीबंधानुसार असलेल्या पदांची संख्या, त्यानंतर महत्त्वाच्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, वाहनांची संख्या, राज्यअतिथी गृह येथील सोयी सुविधा तसेच विभागांतर्गत असलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0000
निलेश तायडे/विसंअ/