रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री भरत गोगावले

रोजगार हमी विभागाचा आढावा

मुंबई, दि. ०३: ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी रोजगार हमीची कामे ही रोजगार मिळवून देणारी आहेत. त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर त्यांची उपजीविका चालते.  त्यामुळे रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात श्री. गोगावले यांनी रोजगार हमी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

रोजगार हमी मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत. याचा विचार करून मजुरीचे दर ठरवण्यात यावेत. ग्रामीण भागात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. उद्योग क्षेत्रातील मजुरीचे दर जास्त आहेत. या सर्वांचा विचार होऊन मजुरीचे दर ठरवावेत. रोजगार हमीच्या माध्यमातून शेतीविषयक कामांसाठी जास्त मजूर उपलब्ध होतील यांचे नियोजन करावे. जेणेकरून शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊन ग्रामीण भागाचा विकास साधता येईल. रोजगार हमीचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने रोहयो विभागामार्फत ठोस कामे शंभर दिवसात हाती घेण्यात यावीत. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे.  रोजगार हमी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवड कार्यक्रमाविषयी जनजागृती करावी. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होत आहे. त्यामुळे फळबाग लागवड कार्यक्रमास प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. गोगावले यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, रोहयोचे सचिव गणेश पाटील, उपसचिव अतुल कोदे, ज. व. वळवी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ