मुंबई, दि. ०३ : राज्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देवून स्वच्छतेची कोटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महिला प्रवाशांसाठी प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. एस. टी महामंडळ नफ्यात राहण्यासाठी महामंडळाने बृहत कृती आराखडा तयार करावा. यासाठी परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, वाहतूकदार यांच्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करावा, अशा सूचना परिवहन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या.
मंत्रालयात समिती सभागृहात आयोजित बैठकीत परिवहन विभागाचा आढावा राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी घेतला.
स्क्रॅपिंग धोरणानुसार जुन्या बसेस निकाली काढाव्यात. चालकांनी मद्यप्राशन करून बस चालविण्याच्या तक्रारी निर्दशनास आल्यास त्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांची सातत्याने मद्य प्राशनासंदर्भात तपासणी करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळेल, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यावेळी म्हणाल्या.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, राज्यातील परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये परिवहन कार्यालयांमध्ये जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. ही वाहने ठेवण्यासाठी स्वंतत्र जागा, तपासणी नाके असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी नाक्यांच्या जागा यासाठी उपयोगात आणण्याबाबत कार्यवाही करावी. रस्ता सुरक्षा सध्याचा ज्वलंत विषय आहे. अपघातांचे प्रमाण कमी करून यामध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
यावेळी बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजय सेठी, आयुक्त विवेक भिमनवार, राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माधव कुसेकर, सहसचिव श्री. होळकर, परिवहन उपायुक्त श्री. कळसकर, महामंडळाचे वित्तीय सल्लागार व व्यवस्थापक गिरीश देशमुख आदी उपस्थित होते.
खाजगी बसेसना परवानगी देताना त्यामध्ये शहरातील प्रवासी चढउताराबाबत अटी व शर्ती टाकण्याबाबत पडताळणी करावी. मोठ्या शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात खासगी बसेस येतात. या बसेसच्या प्रवासी चढउतार करणाऱ्या जागा बऱ्यापैकी शहरात असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा यामुळे अपघात होवून जीवित हानीच्या घटना घडतात. शहरात अशाप्रकारच्या खाजगी बसेस प्रवासी चढ उतार करण्यासाठी धोरण तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत नवीन बस स्थानकांचे बांधकाम, प्रवासी कर, प्रवासी सवलती, आकृतीबंध, नवीन बस खरेदी आदींचा आढावाही घेण्यात आला.
०००
निलेश तायडे/विसंअ