रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले व्हावे – मंत्री ॲड. आशिष शेलार

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाची पाहणी

मुंबई, दि. ०३:  पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारीअखेर खुले करु देता येईल, या दृष्‍टीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून आज या कामाची पाहणी मंत्री श्री. शेलार यांनी केली. यावेळी अकादमीच्‍या संचालक मीनल जोगळेकर यांच्‍यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते.

नुतनीकरण करताना कलावंत व प्रेक्षकांना अद्यावत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून रवींद्र नाट्य मंदिरात नाटक अथवा सिनेमा पाहता येणार आहे. त्‍यासाठी मोठी एलईडी स्क्रिन व सिनेमासाठी आवश्‍यक असणारा डॉल्‍बी साऊंड सिस्‍टीमही उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. तर नाटकांसाठी लागणारी साउंड सिस्‍टीमही अद्यावत करण्‍यात आली असून आसन व्‍यवस्‍थाही आरामदायी करण्‍यात आली आहे. मिनी थि‍अटरमध्‍ये  अशाच प्रकारे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सिनेमासाठीही सर्व सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून नाटक, सांस्कृतिक, संगीत, साहित्यिक कार्यक्रमांसह मराठी सि‍नेमांसाठी ही दोन थिएटर उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.

कलावंतांना जे आवश्‍यक आहेत, त्‍या पद्धतीने सुसज्‍ज असे मेकअप रुम व थिएटरच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून कलादालन व इतर दालने अत्‍यंत देखण्‍या स्‍वरुपात उभारली जात आहेत. शिवाय बाहेर छोटे खुले नाटयगृहही तयार करुण्‍यात येत आहे. या संपूर्ण वास्‍तूला मराठेशाहीचा साज चढवण्‍यात येणार आहे. तसेच आतील भागात मराठी कला संस्‍कृती व नाट्य परंपरेचा विचार करुन सजावट करण्‍यात येणार आहे. आज मंत्री ॲड आशिष शेलार यांनी या संपुर्ण कामाची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले तसेच काही सूचनाही केल्‍या.

०००

संजय ओरके/विसंअ