सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

मुंबई, दि. 4: सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ आज दुपारी 4 च्या दरम्यान दोन युवक निष्काळजी व भरधाव वेगाने हुल्लडबाजी (कार रेसिंग) करत वाहने चालविताना आढळून आले आहे. यामधील वाहन क्रमांक एम. एच 12 एफ वाय 7263 या वाहनाचा सागरी किनारा रस्त्याचे भिंतीला धडकून अपघात झाला. या वाहन चालकावर मलबार हिल पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाकडून एम एच 12 एफ वाय 7263 व एम एच 03 एडब्ल्यू 2255 ही वाहने दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दोन्ही वाहन चालकांचे परवाना तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे.

राज्यामध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन-2025 या वर्षात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त विविध विभागांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक शहरांमध्ये, विशेषतः महामार्गावर तरूण मुले बाईक रेसिंग अथवा कार रेसिंग करत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकारे वाहन चालविणे हे मोटार वाहन कायद्याच्या भंग करणारे असून यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात परिवहन विभागाने मोहिम सुरू केली आहे. जर अशा पध्दतीने वाहने चालविणारे आढळून आल्यास अशा व्यक्तींची वाहने जप्त करण्यात येवून अशा वाहनांची भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन नियमानुसारच वाहने सुरक्षितपणे चालवावीत, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त रवि गायकवाड यांनी केले आहे.

000