विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी

छत्रपती संभाजीनगर, दि.04, (विमाका) :- विभागीय आयुक्त श्री. दिलीप गावडे यांनी आज  जायकवाडी धरणातील उद्भव विहीर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुदधीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

पाहणी दौऱ्यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे  प्रकल्प संचालक श्री. रविंद्र इंगोले, मजीप्रचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. फालक काझी, ठेकेदाराचे प्रतिनिधी श्री. महेंद्र गोगुलोथु यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी मजीप्रा, कंत्राटदार कंपनी आणि महापालिकेच्या सबंधित यंत्रणेला कामाबाबत तत्पर राहण्याच्या सूचना दिल्या. महापालिका व कंपनीतर्फे करण्यात येणारी उपाययोजना याबाबत माहिती घेतली. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे पाइपलाइनला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच योजनेचे काम नियोजनपूर्वक व गुणवत्तापूर्वक करावे असेही विभागीय आयुक्त गावडे म्हणाले. जायकवाडी धरणक्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचे काम, फारोळा येथील २६ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून अडचणीही जाणून घेतल्या.  महावितरण तसेच मजिप्रा,राष्ट्रीय महामार्ग यांना कामाबाबत सूचना केल्या.

 

*****