पुणे, दि. ०५: पत्रकार संघटनेने यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे. आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड योग्यवेळी आणि महत्त्वाची आहे, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
मराठी पत्रकार संघाच्यावतीने हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट येथे आयोजित ‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढारी समूहाचे अध्यक्ष योगेश जाधव, दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, रुपेरी किनार फाउंडेशनच्या संस्थापक कल्पना जावडेकर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला या हॅकेथॉनला उपस्थित राहताना आनंद होत असल्याचे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, आजचा दिवस राज्याच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाचा आहे. राज्यातील पत्रकारितेच्या उल्लेखनीय प्रवासाचे स्मरण करताना, आपण त्याच्या समृद्ध वारशावर आणि या सतत विकसित होत असलेल्या परिस्थितीत पुढे जाण्याच्या मार्गावर प्रकाश टाकला पाहिजे.
बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या दूरदृष्टीने ६ जानेवारी १८३२ रोजी पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’च्या रूपाने महाराष्ट्रातील पत्रकारितेचा पाया रचला, त्यांचा वारसा महाराष्ट्रातील पत्रकारांना आजही प्रेरणा देत आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी सर्व पत्रकार आणि मराठी पत्रकार संघटनेच्या कौतुकास्पद प्रयत्नांबद्दल राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.
आज नवीन घडामोडीला कोणीही थांबवू शकत नाही. एआयमुळे सर्व क्षेत्रात शास्त्रीय विकास होणार आहे. पूर्वी वायरच्या सहाय्याने होणारा दूरसंचार नंतर वायरलेसच्या माध्यमातून, त्यापुढील काळात सॅटेलाईटच्या तर आताच्या काळात संगणक अशा माध्यमातून होत आहे. ‘एआय’ हे माध्यम असले तरी बातमी देणारा पत्रकार हा नि:पक्षपाती असला पाहिजे. पत्रकारांकडून सत्य आणि नि:पक्षपाती वृत्तांकनामुळे भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
घटना जशी असेल तशी जनतेपर्यंत पोहोचविल्यास आपली प्रगती घडून येणार आहे. २०२७ पर्यंत विकसित भारत होण्याचे लक्ष्य हे देशाच्या नागरिकांपर्यंत जोपर्यंत सत्य पोहोचत नाही तोपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रतिभावान पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पत्रकार भीतीशिवाय, सत्याच्या बाजूने तसेच समाजाच्या कल्याणासाठी लिहितात, अवैध काम करणाऱ्यांना उघडे पाडत असल्यामुळे प्रशासनाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागते.
जेव्हा आपली हृदयापासून खात्री होते तेव्हा जिज्ञासू वृत्ती तयार होते. सुरुवातीला आपल्या कार्याला स्वीकारले गेले नाही तरी काम करत राहिल्यास एक ना एक दिवस जनता आपल्याकडून चांगल्या बाबी नक्कीच स्वीकारेल. त्यासाठी जनतेसमोर काम करण्याचे, सत्य सांगण्याचे आणि सत्य प्रस्थापित करण्याचे धैर्य आपल्याकडे असले पाहिजे, असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला.
आपण आधुनिक आर्थिक विकास तसेच आधुनिक शास्त्रीय विकासाला स्वीकारणे आवश्यक आहे. पत्रकारितेत एआय-चालित नवोपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टिकोनावर आधारित ही कार्यशाळा आहे. युवकांना, ते जनतेपर्यंत सत्य कसे पोहोचवू शकतात हे माहिती झाले पाहिजे. यादृष्टीने या हॅकेथॉनमध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याच्या प्रयत्न अतीशय चांगला आहे. या हॅकॅथॉनच्या माध्यमातून जनतेपर्यंत सत्य पोहोचविणारे दहा नागरिक जरी निर्माण करु शकलो तरी ते खूप मोठे यश असेल.
मराठी भाषा महान भाषा असून तीला आपली स्व:ताची संस्कृती आणि वारसा आहे. ही एक सर्वात जुन्या भाषेपैकी असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.
पत्रकारिता ही भयापासून, मर्जीपासून आणि सत्याशिवाय अन्य कोणत्याही बाबीपासून मुक्त असली पाहिजे. ज्यात या देशाचे खरे यश सामावलेले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी श्री. जाधव, श्री. बाविस्कर तसेच श्रीमती जावडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. किरण जोशी यांनी स्वागत केले.
यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात ‘संपादक व्रतस्त पुरस्कार’ पुढारी समूहाच्या संपादक स्मिता योगेश जाधव, दैनिक लोकमतचे यदू जोशी, दै. सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, न्यूज १८ लोकमतचे विलास बडे यांना देण्यात आले. तसेच विशेष पुरस्कार रुपेरी किनारच्या श्रीमती कल्पना जावडेकर, एड्यूटेकचे निलेश खेडेकर यांना देण्यात आले.
हॅकॅथॉनमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या महाविद्यालयांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
०००