महाबळेश्वर परिसरात भव्य राज्यस्तरीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 10 (जि.मा.का.) : 10 वी 12 वीच्या परीक्षा संपल्यानंतर महाबळेश्वर-पाचगणी परीसरात तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव घेण्यात येईल, त्यासाठी प्रशासनाने सुयोग्य जागा निवडावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण तालुक्यातील विधानसभा मतदार संघातील मंजूर, सुरु असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक ,  उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक युवराज कर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

निवडणूकीपूर्वी अनेक विकास कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. सध्या ही विकास कामे कोणत्या टप्प्यावर आहेत यासंबधीचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला. यामध्ये पाटण येथील प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, लोकेनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर येथील शताब्दी स्मारकाच्या टप्पा क्र. 2 मधील नाट्यगृह व मुलामुलींचे वसतिगृह, राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी प्रशक्षिण संस्था इमारत, नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, पाटण विधानसभा मतदासंघातील विविध पुनर्वसनाची कामे, जलजीवन मिशनमधील कामे, पाणंद रस्ते, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारक आदि सर्व कामांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावेळी शंभूराज देसाई यांनी  स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व मॉडेल स्कूल चा पॅटर्न राबविणारा सातारा जिल्हा राज्यासाठी आर्दशवत ठरला आहे. सातारा जिल्ह्याचे हे दोन्ही उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. या उपक्रमांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक शाळा, व पीएचसींची कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण होतील. या उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास 153 कोटी रुपये देण्यात आले आहे असे सांगून या दोन्ही योजनांमधील कामांचा आढावाही घेण्यात आला.

या बैठकीत नागठाणे येथे नॅशनल हायवेवर काम रखडल्याने वाहतूक कोंडी होऊन जवळपास 10 किमीच्या रांगा लागत आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.  स्थानिक ग्रामस्थांची दुसऱ्या अंडर पासच्या रस्त्याची मागणी आहे. त्याप्रमाणे वेगळा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना दिल्या. सध्या सुरु असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामांपैकी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 185 पाणंद रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. अनेक रस्त्यांमध्ये शेतकऱ्यांची मान्यता मिळण्याबाबत अडचणी येत आहेत. यावर चर्चा होऊन ज्या रस्त्यांच्या कामांसाठी शेतकऱ्यांच्या मान्यतेची अडचण होत आहेत अशा ठिकाणी तहसिलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात व शेतकऱ्यांची संमती मिळावावी. पावसाळयापूर्वी पुनर्वसनाची कामे मार्गी लावावीत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेली सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतील याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश दिले.