रायगड जिमाका दि. 12- स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड परिसर हा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येत असून त्यांच्या नियमाखाली सर्व प्रशासन काम करीत आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रायगडची विकासात्मक कामे चालू आहेत त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा हा जुन्या पद्धतीने बांधून त्याचे संवर्धन करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रl राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या ४२६ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते. यावेळी श्री. गोगावले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन,अभिषेक व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती महाड गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे,यांसह विविध अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या जन्मोत्सव सोहळ्याला विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य, शेकडो शिवभक्त आणि पाचाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.