मुंबई, दि. १५ : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून सुरू करण्यात आलेल्या ‘अटल’ (ATAL – Assessment, Tests And Learning) ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, सीईटी सेलचे घनश्याम केदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येणार आहे. या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी होईल. शैक्षणिक आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल. सायकोमेट्रिक टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देणारा आहे.असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
अधिक माहिती https://cetcell.mahacet.org यावर उपलब्ध आहे.
0000