राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. १५ : राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते. राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत. लाभार्थी संख्या जवळपास दोन कोटी पर्यंत आहे. विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले.

राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्ण सेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा. या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी.  तसेच संलग्न केलेल्या २५३ रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी. रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी,  अशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक (वैद्यकीय) शशी कोळनुरकर, सहसचिव श्री. लहाने, सहसंचालक तुलसीदास सोळंके उपस्थित होते.

आरोग्य मंत्री म्हणाले, राज्य कामगार विमा सोसायटीच्या शिखर समितीची बैठक तातडीने घेण्यात यावी. सोसायटीच्या नव्याने मंजूर १८ रुग्णालयांसाठी भूसंपादन पूर्ण करावे. राज्य कामगार विमा सोसायटीने मागील तीन वर्षातील कार्य अहवाल सादर करावा. सद्यस्थितीत असलेल्या कामगार रुग्णालयांची डागडुजी करून त्यांचा मेक ओव्हर करावा. सोसायटीच्या रुग्णालयांची जागा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास कामगारांना महागड्या खाजगी रुग्णालयांमधून उपचार घ्यावे लागणार नाही. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कामगारांसाठी ही रुग्णालये संजीवनी आहेत. सोसायटीच्या कामकाजाचा  दरमहा आढावा घेण्यात यावा. या सोसायटीच्या रुग्णालयांमधून गतिमान वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

सोसायटीचे संचालक श्री. कोळनुरकर यांनी यावेळी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००