मुंबई, दि. 16 :- नवकल्पना आणि ऊर्जा हे स्टार्टअप्ससाठी अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदारांना होणारा फायदा ही महत्वाची बाब असल्याचे मत राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवसमध्ये ‘स्टार्टअप्स कसे सुरू करावे’ याविषयी मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, स्कॉईडव्हेंचर्सचे संस्थापक ईसप्रीत सिंग गांधी यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या चर्चासत्रात व्यक्त केले.
वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्लू स्मार्टचे सह संस्थापक पूनित गोयल यांनी याचे सूत्रसंचालन केले.
100 पैकी 99 लोकांनी एआय (AI) सोबत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. कोणताही नवीन स्टार्टअप्स सुरु करताना त्यातून बऱ्यापैकी नफा व्हायला हवा हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. बहुतेक माणसे गुंतवणूक करताना सर्व विचार करूनच योग्य तो निर्णय घेतात. आपल्या देशातील शासकीय यंत्रणा खूप चांगली आहे. गुंतवणुकदारांनी आसपासच्या वातावरणाचा व्यवस्थित अंदाज घ्यावा आणि मगच स्टार्टअप्सला सुरवात करावी. ऑनलाईन शिक्षण सुद्धा सहज उपलब्ध करून दिले जात असून व्यवस्थित प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळतेच हा मंत्र लक्षात ठेवावा.
सुरवातीच्या काळात स्टार्टअप्स कसे असेल हे संपूर्णपणे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कोणताही व्यवहार करताना तुम्ही आत्मविश्वास आणि योग्य नियोजनासोबत केलेले काम महत्वाचे ठरते असे मत या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
००००
संध्या गरवारे/विसंअ/