- नेर तालुकास्तरीय क्रीडा व कला महोत्सव
- क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वाढवणार
यवतमाळ, दि.१७ (जिमाका): तालुकास्तरावर आयोजित क्रीडा व कला स्पर्धेतून केवळ खेळाडू घडतात असे नाही तर बाल खेळाडू़ंचे व्यक्तीमत्व आणि त्यांची जीवनशैली देखील घडते. याच स्पर्धांमधून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
खेळ व कला संवर्धन मंडळ, पंचायत समिच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज तालुका क्रीडा संकुल नेर येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा व कला महोत्सवास मंत्री श्री. राठोड यांनी भेट देऊन बाल खेळाडूंचा उत्साह वाढवला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भाऊराव ढवळे, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, सुर नवा ध्यास नवा फेम बाल गायिका स्वराली जाधव, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निता गावंडे, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, शिल्पा पोलपीलवार, शालेय पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक आदी उपस्थित होते.
क्रीडा, कला समाजाच्या विकासाचे स्तंभ आहे. यामुळे केवळ मनाचेच आरोग्य सुधारत नाही तर व्यक्तीमत्वाचा देखील विकास होतो. शिस्त, सहकार्य, संयम खेळाच्या माध्यमातून बाल खेळाडूंच्या मनात बिंबविल्या जाते. मुलांसाठी क्रीडा, कला अत्यंत महत्वाचे आहे. बालकांचे कौशल्य प्रदर्शन अशा स्पर्धांमधूनच होत असते, असे पुढे बोलताना मंत्री श्री.राठोड म्हणाले.
कला स्पर्धांमधून चांगले कलावंत तयार होतात. संस्कृतीचा वारसा जपला जातो. तालुकास्तरीय कला, क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी मागील काळात निधी वाढवून दिला होता. परंतू चांगल्या आयोजनासाठी हा निधी ३ लाखापर्यंत करण्यासाठी प्रयत्न करु, असे मंत्री श्री. राठोड म्हणाले. गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सर्व शिक्षक संघटनांच्यावतीने मंत्री श्री. राठोड यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी मंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेतील जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद मालखेड खुर्द शाळा, तालुकास्तरावर प्रथम ब्राम्हणवाडा पश्चिम, द्वितीय लोणाडी, तृतीय मांगलादेवी तसेच मागील वर्षातील तालुकास्तरीय द्वितीय अडगाव, तृतीय लोहनवाडी या शाळांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गायिका स्वराली जाधव, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन गवई, क्रीडा महोत्सव आयोजन समिती सचिव गणेश मेंढे, विजयश्री वडटी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महादीप परिक्षेतील यशस्वी विद्यार्थी अरमान खान, झुबेदा खान, आयुष गोगटे, विश्व बांबोर्डे, भावेश माहुरे, हिना शेख नाजीम, रुपाली मलाये यांना मंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बाल खेळाडू, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००