राज्यात तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान राबवणार – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

मुंबई, दि. 18: राज्यात तांत्रिक व वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग  मंत्री संजय सावकारे यांनी दिली. मंत्री श्री.सावकारे म्हणाले की, जागतिक दर्जाची तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादने आणि सेवा विकसित करून महाराष्ट्राला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे राष्ट्रीय आणि जागतिक केंद्र  करायचे आहे.

यामध्ये विशेष चाचणी प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि कौशल्य विकास संस्था यांच्यासह  तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या निर्मिती आणि विकासाला सहाय्य करणाऱ्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, तांत्रिक वस्त्रोद्योगात प्रगत यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान हाताळण्यास सक्षम असलेले कुशल मनुष्यबळ विकसित करणे, तांत्रिक वस्त्रोद्योगातील संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे, बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करणे आणि तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या संभाव्य उपयोग क्षमतेबाबत जागरूकता वाढवणे, तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य सुलभ करणे, तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादनांसाठी गुणवत्ता मानके आणि प्रमाणपत्रे स्थापित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योगात पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया आणि सामग्रीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे, याचा यामध्ये समावेश असेल, असेही मंत्री श्री. सावकारे यांनी यावेळी सांगितले.