नंदुरबार, दिनांक 18 जानेवारी, 2025 (जिमाका) : स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होण्याबरोबरच उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार, संबंधित मालकाला, शेतकऱ्याला त्याच्या जमिन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 29 गावांना केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, माजी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उदयकुमार कुसुरकर, नोडल अधिकारी जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख किरणकुमार पाटील, पदाधिकारी विजय चौधरी, निलेश माळी यांच्यासह 29 गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, देशातील सर्वच भागात जमिनींच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच विवाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. या सारख्या गोष्टींचा विचार करून देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबवली आहे. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांकडे आजही आपले घर आणि जमिनीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारकडून ग्रामीण भागातील शेती, जमीन आणि घरांचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाते. सर्वेक्षण केल्यांनतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल. जेणेकरून कागदपत्रे नसलेल्या लोकांनाही निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या 29 गावांना मिळाले स्वामित्व प्रमाणपत्र
- अक्कलकुवा तालुका– बि. अंकुशविहीर, घोटपाडा, शलटापनी, घुणशी, वीरपूर, व सिंगपूर बुद्रूक.
- तळोदा तालुका– मोहिदा, मोरवड, दलेलपूर, सिंगसपूर, व राणीपूर.
- शहादा तालुका– बिलाडी त.स., उंटावद, भडगांव, बुडीगव्हाण, व चिरडे.
- नंदुरबार तालुका– पळाशी, खोडसगांव, ओझर्दे, खैराळे, व वरुळ.
- नवापूर तालुका– कोठडा, वडखुट, अंठीपाडा, कडवान, तारापूर, बिलदा, नगारे व नावली.
या 15 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले ‘ई-प्रॉपर्टी कार्ड
सुक्रीबाई पुंजऱ्या कोकणी, हिरालाल मोतीराम कोकणी (ओझर्दे), सतीश नरसु पाटील, नलीबाई टिला पाटील (पळाशी), रमेश पोज्या गावित,दिवाजी राज्या गावित (खैराळे), राणीबाई सुरेश पाडवी, वीरसिंग पवार (वरुळ), यशवंत जगनलाल ठाकरे, पिंटू विश्राम ठाकरे (खोडसगांव), जेसमी रुना वळवी, मालती उखाड्या गावित, बैसी जेहऱ्या वळवी, विलास गावा वळवी व चिमा जिवल्या नाईक (नावली).