मुंबई, दि. २२ – मराठी भाषा विभागातर्फे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात मराठी ही या विश्व मराठी संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून त्याअनुषंगाने या कालावधीत विविध भाषा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्था यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध प्रकाशन संस्था, ग्रंथविक्रेते तसेच मराठी भाषा आणि संस्कृती यासंबंधी वेगवेगळे उपक्रम करणाऱ्या संस्था यांना त्यांची पुस्तके/उत्पादने यांच्या प्रदर्शन/विक्री करिता दालने उपलब्ध करून देण्यात येतील.
या विश्व मराठी संमेलनात ग्रंथ/पुस्तके/उत्पादने यांच्या प्रदर्शन/विक्रीकरिता सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दि.२५ जानेवारी पर्यंत अर्ज project3.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावे. काही ग्रंथ दालने शासकीय विभागांसाठी राखीव असतील. दालनांचे वितरण / वाटप अधिकार दालन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
तरी इच्छुक प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्था यांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपला सहभाग नोंदवावा. प्रदर्शनास उपस्थित राहणाऱ्या दोन प्रतिनिधींच्या आधार कार्डची छायाप्रत, आपल्या प्रकाशनाचे नाव, इ-पत्ता, संपर्क क्रमांकासहीत project3.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या श्रीमती सुरेखा कांबळे-साळवे संपर्क क्र. ८२९१७९५४८५ श्री. निलेश यादव संपर्क क्र ७७१०८९९७०४ यांच्याशी संपर्क साधावा, असे राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/