महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे उद्घाटन

नागपूर, दि. 23 :  मिहान पुनर्वसन क्षेत्रामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, खापरी रेल्वे कलकुही येथील सरपंच रेखा सोनटक्के, उपसरपंच प्रमोद डेहनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक रहिवासी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त एका रुग्णवाहिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पारदर्शी आणि गतिमान कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट शाळा बांधकाम करून देण्यात आली आहे. या शाळेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता तो आता निकाली निघाला.  अजून 55 लक्ष रुपये या शाळेवर खर्च करायचे आहेत. एक चांगली कॉम्प्युटर लॅब, सोलर टॉप अशा सर्व आवश्यक सुविधा या ठिकाणी निर्माण करून डिजिटल शाळा करण्याचा प्रयत्न आहे. 3 फेब्रुवारीला मिहानमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.