ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

‘ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला’ - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.24 :- ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीने मांडले.  पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी समरस झालेला, लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. रामभाऊ जोशी यांनी सात शतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. रामभाऊ जोशी यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

—-*—