व्हीसीद्वारे जिल्हा प्रशासनाचा आढावा ; पालकसचिवांची उपस्थिती
चंद्रपूर, दि. 24 : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यात सुरवातीच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून मुख्यालय स्तरावर याबाबतचा आढावा नियमितपणे होणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात अग्रेसर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केल्या.
दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये, शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासकीय अधिका-यांनी शासकीय दौरे करतांना त्या ठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांना भेट देणे आणि शासकीय कार्यालयात येणा-या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचे आणि फिल्ड व्हिजीटचे वेळापत्रक तयार करावे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात.
शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक आहे. 15 एप्रिल 2025 च्या आत कृती आराखड्यानुसार दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल, याची दक्षता घ्यावी. यात कोणतीही हयगय होता कामा नये. शासन स्तरावर 100 दिवस कृती आराखड्याचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे, त्यामुळे अधिका-यांनी उद्दिष्ट ठेवून काम करावे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवावा. तसेच पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत ठेवावे. त्याची नियमित साफसफाई होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा इतर राज्यांना लागून असल्यामुळे अवैध वाहतूक, गो-तस्करी या बाबींना आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने कडक पाऊले उचलावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.
लोकाभिमुख होऊन काम करा – पालक सचिव संतोषकुमार
राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची जिल्हा पातळीवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. शासन हे लोकाभिमुख असावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख होण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडविणे, आठवड्यातून दोन वेळा फिल्ड व्हिजीट करणे, गावात गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणे, आदी बाबी करणे आवश्यक आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात चांगले प्रशासन चालवावे. येत्या 100 दिवसात चंद्रपूर जिल्हा प्रशासन नक्कीच चांगले काम करेल, अशी अपेक्षा अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोषकुमार यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी सादरीकरणात 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत विभागांचे संकेतस्थळ अपडेट करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, व्हॉट्सॲप चॅटबोट, जनतेच्या तक्रारींचे नियोजन, कार्यालयातील सोयीसुविधा, स्वच्छता, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा व सुरू असलेले प्रकल्प, गुड गव्हर्नन्स आदींचे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलिस विभाग तर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर महानगर पालिकेबाबत सादरीकरण केले.