१०० दिवसांच्या कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – पालक सचिव तथा नगर विकास प्रधान सचिव के एच गोविंदाराज

रायगड जिमाका दि. 24– राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे.  जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी कृती आराखड्यानुसार प्रभावी कार्यवाही करावी, अशा सूचना आज पालक सचिव तथा नगर विकास प्रधान सचिव के एच गोविंदाराज यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात  शासनाच्या सर्व विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रधान सचिव गोविंदराज हे दूरदृश्यप्रणाली द्वारे या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी डॉ भरत बास्टेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, डॉ रविंद्र शेळके यांसह सर्व कार्यालय विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्री गोविंदाराज विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी. कार्यालयाचे संकेतस्थळ हाताळण्यास सुलभ असावे. संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम, 2005, मधील तरतुदींनुसार जास्तीत जास्त माहितीचे स्वयंप्रकटीकरण गरजेचे आहे. वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध होईल याबाबत काळजी घ्यावी. तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलित कामकाजाच्या पद्धर्तीचे पुनर्विलोकन करुन प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये किमान दोन सेवा अतिशय सुलभ पध्दतीने द्याव्यात. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता सातत्याने विभागाकडून प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या कार्यालयात स्वच्छता राहील, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.सर्व अभिलेखांचे शासन निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.  नागरिकांकडून कार्यालयास प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे (आपले सरकार, पीजी पोर्टल) तत्परतेने निपटारा करण्यात यावा.  गुंतवणूकदार, उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरीता सामूहिक प्रयत्न करावेत असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
रायगड जिल्हा प्रशासनाने 100 दिवस आराखडा अतिशय सूक्ष्म नियोजन करून तयार केला आहे. सर्व यंत्रणा परस्पर समन्वयाने प्रभावी काम करीत असल्याबद्दल श्री गोविंदाराज यांनी यंत्रणेचे कौतुक करून रायगड जिल्हा या अंमलबजावणीमध्ये राज्यात अग्रेसर राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचे सविस्तर सादरीकरण केले. रायगड जिल्हा सुशासनात राज्यात पहिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये रायगड जिल्ह्याचे 92.5% काम असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी जिल्हा परिषदेच्या नियोजनाची माहिती सादर केली.
पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल महानगरपालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची, उपक्रम यांची माहिती सादर केली.