मुंबई, दि. २४ : ‘विकसित भारत २०४७’ मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या $५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे राज्य असेल असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना माहिती तंत्राज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल.
हे विद्यापीठ अत्याधुनिक संशोधन आणि कौशल्य विकासासाठी केंद्रस्थानी राहील. तसेच हे विद्यापीठ भारतीय तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी तयार करेल,” असेही ॲड. शेलार यांनी सांगितले.
सरकार लवकरच देशातील पहिले राज्यस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर धोरण जाहीर करणार असून यासाठी एक विशेष टास्कफोर्स स्थापन करण्यात आले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांच्याच नेतृत्वाखाली या धोरणाचा आराखडा तयार होईल. तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असेल. आमचे सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवसंकल्पनांच्या संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणात परिवर्तन घडवून, भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
००००
संजय ओरके/विसंअ