मुंबई, दि. २४ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पावले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री श्री.शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, केंद्रीय सचिव आशीष बुधानी, पंकज बन्सल, तसेच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच संपूर्ण देशभरातून सहकार चळवळीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन, नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ दरम्यानच्या उपक्रमाचे वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.
केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमित शाह म्हणाले की, अम्ब्रेला संगटनामुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्षेत्राला फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय आणि खासगी बँकेमध्ये सेवा मिळतात, अगदी त्याचप्रमाणे सहकारी बँकेद्वारे सेवा मिळतील. यासाठी सहकारी बँकेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे. आज एक हजार ४६५ सहकारी अर्बन सहकारी बँका असून त्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. आगामी काळात वित्तीय व्यवहार हा सहकारी बँकामार्फत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवीन पिढीने त्याबाबतचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात रोजगार निर्माण करावयाचा असेल तर सहकार क्षेत्राला नवीन आयाम देणे आवश्यक आहे. भारत सरकारने साखर उद्योगासाठी १० हजार करोड रूपयांचा इन्कम टॅक्स माफ केला आहे. काही वाद राहू नये यासाठी कायद्यात सुद्धा सुधारण केली असल्याचे त्यांनी सांगितले. दहा लाख टन साखर निर्यातीमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. आगामी काळात सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प केला असल्याचेही श्री.शाह यांनी सांगितले.
महाराष्ट्र : सहकार चळवळीची जननी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहकार क्षेत्राची मूळ बिजं रोवली असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ही सहकार चळवळीची जननी आहे. सहकार हे कोणाची मत्तेदारी नसून सहकार हा देशाचा प्राण आहे. सहकार आणि साखर उद्योगाला केंद्र सरकारच्या धोरणांमुळे चालना मिळाली. देशातील गावात सहकाराची मुळे मजबूत होत असून मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायट्यांना इज ऑफ डुईंग बिझिनेसमुळे उपयुक्त असे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमुळे अर्जाची सद्यस्थिती जाणून घेता येते. त्याचबरोबर नवीन १० हजार पॅक्समध्ये फिशरिज, डेअरीची सहकारी संस्था सुरू झाल्या. नाबार्डच्या सहाय्याने देखील ग्रामीण मार्ट सुरू झाले. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, जैविक खते, शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे यासाठी राष्ट्रीय पातळीवर बहुउद्देशीय संस्था सुरू झाल्या. किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम ही सहकारातील मोठी क्रांती असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
सहकाराला बळकट करण्यासाठी या सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले असून सहकाराला संजिवनी दिल्याचे सांगून श्री.शिंदे म्हणाले की, राज्यातील ८ हजार पँक्सचे संगणकीकरण पूर्ण केले आहे. १०० वर्षोपेक्षा जास्त गौरवशाली इतिहास असलेला सहकार आता विदर्भ आणि मराठवाडा या भागात रूजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकाराच्या माध्यमातून सकारात्मक बदल – उपमुख्यमंत्री अजित पवार
सहकार चळवळ अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाऊन ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता नांदत आहे, सहकार चळवळीशिवाय विकास अशक्य होता, असे मत व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सहकार क्षेत्राची ताकद ओळखून सहजता, सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आणि चळवळीला बळकटी देण्यासाठी सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले. सहकाराच्या माध्यमातून आपल्या देशातील शेतकरी, कष्टकरी, महिला, व्यापारी आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यामध्ये तसेच समाजतील उपेक्षित, दुर्बल घटकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सहकार विभागाच्या क्रांतीकारी निर्णयांमुळे चांगले परिणाम दिसू लागले असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकारी चळवळीत कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे. नव्या पिढीला या सहकारामध्ये सामावून घेण्यात येणार असून पुढील दोन तीन वर्षात प्रत्येक गावात सहकारी संस्था स्थापन व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील सहकार चळवळ पूर्ण योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे, असे सांगून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, अनेक माध्यमातून निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही सहकाराशी जोडली आहे. ग्रामीण भागाला मजबूत करण्यासाठी तसेच रोजगार निर्माण करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. पॅक्स मजबूत झाल्यास गावे समृद्ध होण्याबरोबर तेथील गावकरी सुद्धा समृद्ध होणार असल्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना पुनर्जीवन देण्यासाठी अनेक पाऊले उचलली गेली असल्याचे सांगून ते म्हणाले की, मागील दोन आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास आठ हजार कोटी रूपयांची मदत मिळाली आहे. साखर कारखान्यांच्या इन्कम टँक्सच्या समस्या सोडविण्यात आल्या. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काळात एनसीडीसीच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचेही यावेळी सांगितले.
आभार प्रदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री श्री.शाह यांनी सहकार चळवळीला न्याय देण्याचे काम केले आहे. भारताची ओळख ही महाराष्ट्राच्या या सहकार चळवळीमुळे आहे. सर्वसामान्य घटनांना या चळवळीत आणण्यासाठीच्या केंद्रीय सहाकर मंत्री श्री.शाह यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभार मानले.
००००