मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन

पद्म भूषण पुरस्काराच्या औचित्याने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, प्रख्यात गायक पंकज उधास यांना अभिवादन

मुंबई, दि.२५:- भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे.

यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या दोहोंचा त्यांच्या क्षेत्रातील कार्याचा बहुमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून, त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

सुलेखनकार अच्युत पालव, एसबीआयच्या माजी अध्यक्ष श्रीमती अरुंधती भट्टाचार्य, ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्रभूषण अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे- देशपांडे, बारीपाड्याचे वनसंरक्षक चैतराम पवार, ज्येष्ठ गायिका जसपींदर नरूला, अरण्यॠषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ बासरीवादक रोणू तथा राणेंद्र भानू मजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा, चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ विलास डांगरे या सर्वांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. या सर्वांनी आपापल्या कर्तृत्वाने, त्या त्या क्षेत्राचा गौरव वृध्दिंगत केला आहे. या सर्व मान्यवरांनी व्रतस्थ राहून कार्य केले आहे. यामुळे या क्षेत्रांच्या लौकिकात भर घातली गेली आहे. ही बाब प्रेरणादायी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस या सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

अरण्यॠषी श्री. चितमपल्ली आणि डॉ. विलास डांगरे यांची कर्मभूमी नागपूर आणि विशेषत: विदर्भ परिसर राहिली आहे. या दोहोंचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
000