प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन
मुंबई, दि. २६ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. सर्वांनी एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया आणि एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, राज्यपालांच्या पत्नी सुमती, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे मंत्री जो. झेकॅक्स, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर आणि सर्व महान नेते आणि समाजसुधारक यांना अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १०० दिवसांत लोककल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांना आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर सर्व सरकारी सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करण्यासाठी ऑनलाइन आणि मोबाइल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सरकारी कामाला गती देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा उपयोग केला जात आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘महापे’ येथे सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात मदत होईल. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण राहिले आहे आणि एफडीआय आकर्षित करण्यात राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे, ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम २०२३ करिता कापूस व सोयाबीन उत्पादन करणाऱ्या राज्यातील ६८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २ हजार ८०० कोटींहून अधिक रकमेची आर्थिक मदत जमा करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
उदंचन जलविद्युत प्रकल्प धोरणांतर्गत, सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे ३८ प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे ५५,९७० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात मदत होईल आणि २.९५ लाख कोटी इतकी गुंतवणूक आकर्षित होईल. याशिवाय ९०,३९० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय घेण्याची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला आणि अशा कुटुंबातील एका अविवाहित महिलेला १५०० रुपये प्रति महिना दिला जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सुमारे २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थ्यांना सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसामध्ये ४ ते ५ पटीने वाढ करण्यात आलेली असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख पारितोषिकांच्या रकमेत देखील दहा पटीने वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी राज्यपाल यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी वाचून दाखवला.
संचलनात विविध पथकांचा सहभाग
यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृहरक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ. अँटोनिओ डासिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) अंजुमन ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई, स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुले-मुली) बृहन्मुंबई महानगरपालिका ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, महिला निर्भया वाहन पथक, नौदलाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने आदींनी सहभाग घेतला. कमांडर सुमितसिंग चौहान हे संचलन प्रमुख होते.
संचलनात सहभागी वाहने
यावेळी भारतीय नौदलाचे एअरक्राफ्ट कॅरिअर (आयएनएस विक्रांत) (विमान वाहक युद्ध पोत), भारतीय नौसेना सुरत (विध्वंसक युद्ध पोत), वाघशीर पाणबुडी, तेजस फायटरजेट अँड अनमॅनेड एरियल व्हेईकल (हवेतून हवेत व जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र), ब्रह्मोज मिसाईल (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र), वरुणास्त्र टोरपेडो, इंडीजिनीअस रॉकेट लॉन्चर वेपन (पाण्यावरून पाण्याच्या आत मारा करणारे क्षेपणास्त्र) तर बृहन्मुंबई पोलीस दलाचे वाहतूक पोलीस मोटर सायकल पथक (४० गाड्या) आणि महिला निर्भय पथक (चार वाहने), तसेच बृहन्मुंबई अग्निशमन दलातील मिनी वॉटर टेंडर, २४ मीटर उंचीचे कम्बाईन फायर आणि ३२ मीटर टर्न टेबल लॅडर या वाहनांचा समावेश होता.
जनहिताचे संदेश देणारे चित्ररथ
राज्य शासनाच्या विविध विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह संचलनात सहभाग घेतला. यामध्ये सहभागी झालेले विभाग (कंसात चित्ररथाचा विषय) पुढील प्रमाणे : सार्वजनिक बांधकाम (२४ तासात अष्टविनायक दर्शन), वन (आईच्या नावे एक झाड), आदिवासी विकास (वाघबारस), पर्यटन (महाराष्ट्र अनलिमिटेड), मराठी भाषा (अभिजात मराठी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (अनुसूचित जाती आणि विशेष घटकांचा सर्वांगीण विकास), मृद व जलसंधारण (जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण), कृषी (नैसर्गिक शेती), ऊर्जा (अक्षय ऊर्जा), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण (शाश्वत अन्नपूर्णतेकडून सर्वस्पर्शी अन्न शाश्वततेकडे), पाणीपुरवठा आणि स्वच्छता (अटल भूजल योजना आणि जलजीवन मिशन), इतर मागास बहुजन कल्याण (ज्ञानदीप समतेचा), ग्रामविकास व पंचायत राज (लखपती दीदी आणि ग्रामीण घरकुल), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता (कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपडपट्टी पुनर्वसन), नगरविकास (सिडको)(शहरांचे शिल्पकार), गृह (वाहतूक नियंत्रण शाखा)(गतिमान रस्त्यांचे रक्षक), कामगार (महाराष्ट्राची शान कामगारांचा सन्मान) सांस्कृतिक कार्य (महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष).
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या समारंभात सांस्कृतिक कार्य संचालनाकडून किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे, अरुण सुरेश शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि नरेंद्र बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
००००