- समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल
- महिलांच्या सक्षमीकरणास शासनाचे प्राधान्य
- सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रयत्नशील
सांगली, दि. २६, (जिमाका) : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात मंत्री श्री. पाटील यांनी ध्वजवंदन केले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक कार्यालयात संविधान प्रतसाठी आग्रही
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले व 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणले गेले. भारतीय संविधान मार्गदर्शनीय आणि वंदनीय आहे. सर्व शैक्षणिक संस्था व शासकीय, निमशासकीय कार्यालयात सन्मानपूर्वक संविधान प्रत ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.
ड्रगची माहिती देणाऱ्यास बक्षीस घोषित
सांगली जिल्ह्यात पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली आहे. पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती देणाऱ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला मिळणाऱ्या वेतनातून वैयक्तिकरीत्या रक्कम रूपये 10 हजारचे बक्षीस यावेळी जाहीर केले.
शुभेच्छासंदेशात विकासकामांचा आढावा
पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हावासियांना उद्देशून साधलेल्या मार्गदर्शनपर शुभेच्छा संदेशात केंद्र व राज्य शासनाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या कामगिरीचा आढावा घेतला.
जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव तरतूद केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून अनेक नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख कामे हाती घेतली आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सात कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवावा, यामुळे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल. सांगली जिल्ह्यात नऊ लाखहून अधिक शेतकरी आहेत. त्यांना ॲग्रिस्टॅक योजनेतून युनिक फार्मर आयडी देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वितरीत करण्यात सुलभता येईल.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून गेल्या पाच वर्षात एक हजारपेक्षा जास्त प्रकल्पांना मंजुरी दिली आहे व 25 कोटी रूपयांहून अधिक अनुदान मंजूर केले असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्याच्या बाबतीत सांगली जिल्हा देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू आर्थिक वर्षात आजअखेर या योजनेच्या 339 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. रब्बी हंगामाकरिता जिल्ह्यात खते व बी–बियाणांची पुरेशी उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.
उपसा सिंचन व जल जीवन मिशनच्या कामांमधून पिण्यासाठी, पशुधनासाठी व सिंचनासाठी पाणी मिळून दुष्काळी भागातील टँकर संख्या कमी होण्यास मदत झाली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत राज्यात 1 जानेवारी ते 10 एप्रिल या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या दरम्यान विविध घरकुल योजनांतून जवळपास अकरा हजार घरकुलांना मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 मधून 46 ठिकाणी प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून अडीच लाखहून अधिक कृषी पंप ग्राहक वीजबिल माफीचा लाभ घेत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून या वर्षात 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता एकूण 560 किलोवॅट क्षमतेचे सौरविद्युत प्रकल्प बसवण्यात येत आहेत. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनेतून अकराशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंप बसविले आहेत. या सर्वांतून शेतकरी बांधवांना अखंडित व शाश्वत वीज मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महिलांच्या सक्षमीकरणास शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यात जवळपास पावणेआठ लाख महिलांना लाभ देण्यात येत आहे. तर लेक लाडकी योजनेतून गेल्या पावणेदोन वर्षात दोन हजारहून अधिक लाभार्थींना लाभ दिला आहे. उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित निकषानुसार पात्र मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण वाढून मुलींचे शैक्षणिक स्वप्न साकार होत आहे, असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी लखपती दीदी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजनेच्या कामगिरीचा आढावा घेतला.
सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरज व सांगली येथील शासकीय रूग्णालयात बसवण्यात आलेली अत्याधुनिक यंत्रे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून केलेल्या शस्त्रक्रिया, स्मार्ट पीएचसी उपक्रम, सार्वजनिक आरोग्य निर्देशांक, आरोग्य सेवेतील सर्वोच्च एन ए बी एच मानांकन, ई संजीवनी आशा कार्यक्रम यांच्या कामगिरीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून गेल्या पाच महिन्यात तीन हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींना लाभ दिला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून जिल्ह्यात चालू वर्षी 480 लाभार्थींना लाभ दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील व्याज परतावा योजनेतून गेल्या सहा महिन्यात जवळपास साडेचारशे प्रकरणे झाली आहेत. यामध्ये बँकांनी 49 कोटी रूपयांहून अधिक कर्ज रक्कम मंजूर केली आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत कुपवाड भुयारी गटार योजनेची 160 किलोमीटर लांबीची ड्रेनेजची कामे पूर्ण झाली आहेत. स्वामित्व योजनेतून जिल्ह्यात आजअखेर एकूण 336 गावांतील जवळपास 68 हजार मिळकत पत्रिका व सनद तयार झाल्या आहेत. आजअखेर 232 गावात सनद वाटप शिबीर घेण्यात आले आहे.
जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधान्य कुटुंब योजना, अंत्योदय योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे सांगितले.
जिल्ह्याचा सर्वंकष विकास करताना सीमाभागालगतच्या जत तालुक्याच्या विकासावरही लक्ष केंद्रीत केल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जतसाठी म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, मौजे मोरबगी येथे औद्योगिक क्षेत्र, उमदी येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी अद्ययावत निवासस्थाने आदि कामे हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. माझी वसुंधरा अभियानात जिल्हा परिषदेने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
पुरस्कारार्थींचे विशेष अभिनंदन
अनेक सांगलीकरांनी जिल्ह्याची शान वाढवली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) प्राप्त मुरलीकांत पेटकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त पॅराॲथलिट सचिन खिलारी, आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आलेली स्मृती मानधना, अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि सुनील फुलारी, राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त राष्ट्रीय तपास संस्था, मुंबईचे संपर्क अधिकारी अमोल हाके, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक विजेती विश्वसम्राज्ञी माने यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलातील इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार नितीन बराले, हवालदार अहमद मणेर, हवालदार तुळशीराम गोरवे, पोलीस नाईक सलमा इनामदार यांचा गौरव करण्यात आला.
ॲग्रीस्टॅक योजनेंअंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व सातबारा वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान-2025 निमित्त प्रातिनिधीक स्वरूपात हेल्मेट वाटप व रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करीत 9 कोटी 15 लाख रक्कमेची 18 बक्षिसे प्राप्त केली. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचा सन्मान करण्यात आला.
सन 2023-2024 च्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या स्पर्धेत कोल्हापूर विभाग स्तरामध्ये प्रथम क्रमाक प्राप्त जिल्हा परिषद शाळा सिध्देवाडी व उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळांच्या स्पर्धेत कोल्हापूर विभाग स्तरामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी यांचा सन्मान करण्यात आला.
असा झाला ध्वजवंदनाचा कार्यक्रम…
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. संविधान अमृत महोत्सव सन 2024-2025 हर घर संविधान या अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना भारतीय संविधानाची प्रस्ताविका भेट दिली.
यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन दल, शाळांचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
०००