- पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण
- चित्ररथ व सादरीकरणाने लक्ष वेधले
- पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन
नांदेड दि. २६: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे ध्वजारोहन पार पडले. यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत शेती व शाश्वत ऊर्जेच्या सर्व प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा संदेश यंत्रणांना दिला. आजचा प्रजासत्ताक दिन विविध विभागांचे लक्षवेधी सादरीकरण व चित्ररथांमुळे स्मरणीय ठरला.
आज सकाळी 9.15 वा. पालकमंत्री श्री. सावे यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करणाऱ्या पथकांची पाहणी केली. आजच्या परेडचे नेतृत्व पोलीस उपअधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
आज या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपलब्धीसाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी केंद्र व राज्य शासनाने शेती आणि अपारंपरिक ऊर्जेच्या स्त्रोतांना शाश्वत सुत्रामध्ये बांधण्याचे धोरण अधोरेखीत केले. जिल्ह्यातील सिंचन सुविधा आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी किवळा साठवण तलाव पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणल्यास सिंचन क्षमता आणखी वाढेल. यासाठी तातडीने शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या सूचना केल्या.
भारताला अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात भरारी घ्यायची आहे. दावोसमधील नुकत्याच झालेल्या व्यापारी करारामध्ये मोठे प्रकल्प अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतामध्ये होत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे या क्षेत्रात नांदेड जिल्हा अग्रेसर राहील यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतासोबतच शेतीच्या शाश्वत विकासाची हमी बारमाही सिंचन सुविधांनी वाढविण्यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, शेततळे व जलसंधारणाच्या अन्य कामाकडे जिल्ह्यामध्ये पुढील काळात लक्ष दिले जाईल, असे सुतोवाच केले.
शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र व राज्याच्या कृषी क्षेत्राशी संबंधित प्रधानमंत्री किसान योजना, नमो सन्मान योजना, पिक विमा योजना तसेच खते बियाणे कीटकनाशके याच्या खरेदीसाठी पतपुरवठा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी यंत्रणेला दिले. जिल्ह्यात सुरू असलेल्या उच्च मूल्य शेती अभियानाचे त्यांनी कौतुक केले मात्र नैसर्गिक शेती क्षेत्रात वाढ करण्याचे लक्ष्य त्यांनी यावेळी निर्धारित केले.
गेल्या वर्षी झालेल्या शेतीच्या नुकसानी संदर्भात 812 कोटीची मदत शासनाकडून करण्यात आली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पशुसंवर्धन दुग्धविकास याबाबत जिल्ह्याच्या प्रगतीला वाव असल्याचे सांगताना त्यांनी पशुधनाची जी जनगणना सध्या सुरू आहे त्यामध्ये पशुपालकांनी शेतकऱ्यांनी प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहनही केले.
राज्य शासनाच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा उल्लेख करीत त्यांनी जिल्ह्यातील साडेआठ लाख महिला लाभार्थ्यांनी शासनाला साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले लाडकी बहीण योजना यापुढेही कायम सुरू राहील अशी ग्वाही दिली.
राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात पदभरती सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणात अण्णासाहेब पाटील योजनेतून कर्ज वितरण सुरू आहे त्याचा लाभ घेण्याच्या आवाहन त्यांनी केले. 122 कोटीचा व्याज परतावा या योजनेतून शासनाने उद्योग व्यवसाय स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांसाठी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य व केंद्र शासनाच्या विविध घरकुल योजनांमध्ये ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरे देण्यासाठी यंत्रणा आणखी गतिशील करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. घरकुल व आवास योजनेसंदर्भातील उर्वरित सर्व प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे त्यांनी सुचविले.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जातीसाठींच्या विविध योजना तसेच तृतीयपंथीयांसाठी असणाऱ्या योजनांची 100 टक्के अंमलबजावणी जिल्ह्यातील झाली पाहिजे, असे सांगितले.
समाज कल्याण विभागामार्फत वसतिगृहांच्या योजनेत कोणत्याही घटकातील विद्यार्थी सुविधांशिवाय वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी विभागांना सुचविले.
आरोग्य यंत्रणेने वंध्यत्व निवारणासारख्या समस्येवर सार्वत्रिक प्रयत्न सुरू केल्याबद्दल समाधान त्यांनी व्यक्त केले सोबतच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात यावी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय सुविधा औषधोपचार व तात्काळ प्रतिसाद अधिक गतिशील करण्याबाबत त्यांनी यावेळी यंत्रणेला सूचना केली.
नांदेडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील व राज्यस्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजन क्रीडा विभागामार्फत होत आहे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विभागामध्ये नांदेडकडे क्रीडा विषयक अधिक सुविधा आहेत त्यामुळे नांदेड शिक्षणाप्रमाणेच खेळातही स्पोर्ट्स हब व्हावे ,अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केली.यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उपलब्धीसाठी प्रमाणपत्र बहाल केले.
चित्ररथ ठरले लक्षवेधी
यावर्षी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वेगवेगळ्या विभागांना मोठ्या प्रमाणात आपल्या उपलब्धीला चित्ररथाच्या स्वरूपात मांडण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत अनेक विभागांनी आपले चित्ररथ तयार केले होते. पालकमंत्र्यांनी या चित्ररथांची पाहणी केली. महानगरपालिका, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग व क्रीडा विभागाचे चित्ररथ लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली नाथू, रविंद्र पांडागळे यांनी केले.
०००