ठाणे,दि. २६ (जिमाका):- आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, मल्लिकार्जून माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, पराग मणेरे, मीना मकवाणा, पंकज शिरसाठ, शशिकांत बोराटे, शेखर बागडे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, संजय बागूल, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, संदीप थोरात, रेवण लेंभे, उज्वला भगत, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, राहुल सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की, भारत नावाच्या प्रजासत्ताकात आपण सगळे जन्मलो. इथे लोकशाही आहे. प्रजेची सत्ता आहे. २६ जानेवारी १९५० रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरि असते. निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात. मान- सन्मान मिळतो. पण हे सगळे जनतेनेच ठरविलेले असते. तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर, असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो. सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात ट्रस्टी! जनतेने त्यांना दिलेले कर्तव्य बजावून शांतपणे दूर व्हायचे, हे ठरलेले असते. प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदान केले. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदशी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणे, हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे. या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थाने लोकशाहीचे रंग भरले. हे लोकांचे राज्य आहे. याची जाणीव कामातून करुन दिली.
आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो. परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागले आहेत. मोठमोठ्या महासत्तांनाही भारताचे मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. दहा वर्षात भारताचं अंतराळयान चंद्रावर गेले. मंगळाकडे झेपावले, इतकेच नाही तर भारतीय शास्त्रज्ञांनी सूर्याकडेही हनुमानउडी घेतली. हा पूर्वीचा भारत नाही. आताचा भारत शत्रूला “घुस के मारेंगे” हे ठणकावून सांगतो. “सीने में जुनून, आंखों में देशभक्ती की चमक रखता हूं… दुश्मन की सांसे थम जाये, आवाज में वो धमक रखता हूं” हे शब्द आहेत शहीद भगतसिंग यांचे. त्यांचाच तेजस्वी वारसा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे न्यायचा आहे.
महाराष्ट्र हे तर भारताचे ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्राने विकास साधला, तर देशही विकास साधणारच, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, देशाला महासत्ता करण्याचे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे योगदान द्यायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. नवा महाराष्ट्र नवी उत्तुंग झेप घेतोय. आपण कोणीही असू. लहान असू, मोठे असू… सरकारी सेवेत असू, खासगी नोकरी करीत असू, उद्योजक असू, विद्यार्थी असू, शेतकरी असू …. जिथे असू तिथे महाराष्ट्रासाठी, देशासाठी खारीचा वाटा तरी उचललाच पाहिजे. तीच खरी देशसेवा असते.
श्री.शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात विकास आणि कल्याणकारी योजनांची ऐतिहासिक सांगड घातली आणि या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ प्रत्येक समाज घटकाचे कल्याण व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षण पूर्णतः मोफत, मुख्यमंत्री वयोश्री योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची मुहुर्तमेढ रोवली गेली. शेतीसाठी ४४ हजार कोटींपेक्षा जास्तीचा निधी दिला. राज्यात पायाभूत सुविधांची १० लाख कोटींपेक्षा जास्तीची कामे सुरु आहेत. महिलांचे कल्याण, रोजगार, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य यासाठी महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा, असे काम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची कास कधीही सोडणार नाही, याची खात्री मी देतो.
ते म्हणाले की, आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचं समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकलं. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते.
ठाणेकरांना प्रतिक्षा असलेल्या इंटर्नल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी खूप कमी होणार आहे. सध्याच्या फ्रीवेला छेडा नगरपासून ठाण्याच्या आनंदनगरपर्यंत वाढवित आहोत. नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्पसुध्दा टप्याटप्प्याने सुरू होतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफसाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना वेग येतो आहे. आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. कल्याण शिळ मार्गावरून आता प्रवास अधिक वेगवान होणार आहे. इथल्या उड्डाणपूलांच्या तीन मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोंडी होत नाही. या मार्गाचं सहा पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्घाटन आणि रेवस ते रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजनही मी मुख्यमंत्री असताना झाले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, दहा हजार घरे आम्ही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून बांधत आहोत. आशियातली ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतून २६ हजार घरे मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने १६ हजार घरे बांधली आहेत. आवास योजनेमध्ये ठाणे जिल्हा सतत अव्वल राहिला आहे. मुंबईपाठोपाठ आज ठाणे महानगरपालिकेचे नाव घेतले जाते.
ठाणे पालिकेची नवीन आयकॉनिक इमारत उभी राहणार आहे. माझी वसुंधरा 4.0 अभियानात ठाणे महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावून पर्यावरण संवर्धनातही आपण मागे नाही, हे दाखवून दिले आहे. ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाला मोठी गती आम्ही दिली आहे. ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात २८ स्मार्ट ग्राम ग्रंथालये सुरू करून आपण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागे नाही आहोत हे दाखवून दिले आहे. पोलीस दलाचे आधुनिकीकरण व वाहतूक विभागाचे बळकटीकरण करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी मॉडर्न वाहने खरेदी केली आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दीदी यांची पथके स्थापन केली आहेत. ठाणे पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे अॅप सुरू केले आहे. सुमारे साडे सहा हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील महापे इथे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. केवळ ठाणेच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सेवा जलद आणि पारदर्शी मिळाव्यात आणि नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून संगणकीय प्रणालीवर भर देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
नीती आयोग आम्हाला मुंबईच्या Total Transformation साठी मदत आणि मार्गदर्शन करतोय. मुंबई महानगराच्या आर्थिक विकासासाठी एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमओयू देखील झाला आहे. यामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न आता स्वप्न राहिलेले नाही. आगामी काळात मुंबईचा जीडीपी दुप्पट होणार आहे. यामध्ये अर्थातच मुंबई एवढेच पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचे देखील मोठे योगदान असणार आहे, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याचे एकूण अर्थव्यवस्थेतले योगदान ४८ बिलियन डॉलरचे आहे. २०३० पर्यंत ते १५० बिलियन डॉलर इतके करण्याचे ठरविले आहे. सर्वात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं महानगर म्हणून ठाण्याची ओळख करायची आहे. ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे सिद्ध करायचे आहे.
ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि करीत राहू, मात्र यासाठी आपण सर्व एकजुटीने काम कराल, अशी आशा व्यक्त करून श्री.शिंदे यांनी महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. इथे न्यायाचे राज्य आहे. कारण ही छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आहे, याचा विसर एक सेकंदभरही पडता कामा नये. सामाजिक सलोखा राखून एकोप्याने राहून आपण या विकासाच्या वाटचालीत योगदान देणे गरजेचे आहे. या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असावे. प्रत्येक लाडक्या भावाच्या मनगटात आत्मविश्वासाचे बळ असावे. प्रत्येक लाडक्या शेतकऱ्याच्या शिवारात समृध्दीचे पीक बहरावे. प्रत्येक तरुणाच्या भविष्याला यशस्वीतेची सोनेरी किनार असावी, हा आमच्या महायुती सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी हे प्रजासत्ताक अधिक मोठे, अधिक समृध्द आणि अधिक सामर्थ्यवान करायचे आहे. मातृभूमीची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. “वतन के जां – निसार हैं वतन के काम आएंगे… हम इस ज़मीं को एक रोज़ नया आसमां बनाएँगे” या पंक्तींनी मनोगताचा समारोप केला.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे-डमाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांमार्फत शानदार संचलनही करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, व्यक्ती/संस्थांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
या सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२३ जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, ॲग्री स्टॅक योजनेमध्ये सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले शेतकरी, जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक, उत्कृष्ट सेवा बजावलेले पोलीस अधिकारी-अंमलदार, उद्योग विभागाने “वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट” आणि “एक्सपोर्ट प्रमोशन” या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल उद्योग विभागाच्या सह संचालक विजू शिरसाट व उपसंचालक सीमा पवार तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम/कार्यक्रमांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाने व्यापक प्रसिध्दी दिल्यामुळे शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाचीही प्रतिमा उंचाविण्यास उल्लेखनीय यश मिळाले. या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
00000