जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री मेघना बोर्डीकर 

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात

परभणी, दि.२६ (जिमाका) : परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे यासह नागरिक, शेतकरी, महिला, तरुण, आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केले. यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी,  पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली.  आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय.

परभणी विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. आपल्या जिल्ह्यात हा कृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, अशी खात्री आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याकरीता विविध यांत्रिकी कृषी औजारांसाठी केंद्र व राज्यशासन पुरस्कृत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेव्दारे मागील तीन वर्षांत 7 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना रुपये 45 कोटी इतके अनुदान महाडीबीटी पोर्टल प्रणालीव्दारे अदा करण्यात आले आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत सन 2023-24 या वर्षात 282 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली असून 127 लाभार्थ्यांना रुपये एक कोटी 90 लाख अनुदान अदा करण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात परभणी जिल्हा अग्रेसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत चालू वर्षात नवीन विहिरीसाठी 231 लाभार्थी व इतर बाबींकरीता 546 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत नवीन विहिरीसाठी 18 आणि इतर बाबींकरीता 67 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली प्रधानमंत्री सौर कृषी पंप व कुसुम घटक योजनेतंर्गत परभणी जिल्हयातील 9 हजार 882 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेऊन आपले कृषी उत्पन्न वाढवावे. परभणी जिल्हयात रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्त संकलनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा रुग्णालयात नवीन कॅथलॅबचे काम प्रगतीपथावर असून भविष्यात रुग्णांना ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी इत्यादी सुविधा मोफत मिळणार आहे. सेलू येथे 50 बेडचे नवीन स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे. लवकरच हे रुग्णालय कार्यान्वित होईल. जिल्ह्यात सुमारे 5 लाख 47 हजार लाभार्थ्यांना ई-हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. मागील वर्षात या विभागाने वसुलीचे शंभर टक्के उद्दीष्ट्य पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ॲग्रिस्टॅक योजनेची सध्या अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. यासाठी 635 पथकांची गावनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री म्हणाल्या की, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यच्या औद्योगिक विकास साधण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या औद्योगिक समूह विकास योजनेतंर्गत सेलू येथे केशवराज कॉटन क्लस्टर सुरु झाले आहे. 185 लघुउद्योजकांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरु केला आहे. महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे. मागासवर्गीयांच्या  कल्याणासाठी  सामाजिक न्याय  विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जातीच्या एकूण 3 हजार 100 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी गंगाखेड, पालम, सोनपेठ येथे 6 वसतीगृह सुरु करण्यात आले आहेत. रमाई आवास योजने अंतर्गत 24 हजार 979 लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे क्रीडा सुविधा निर्मितीसाठी नव्याने रुपये 123 कोटींची प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळालेली आहे. लवकरच सुविधा निर्मितीचे कामे पूर्ण करण्यात येईल.  पुर्णा, जिंतूर, सेलू  व गंगाखेड  येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत’ शासकीय व खासगी आस्थापनांवर सुमारे 1 हजार 744 रूजू झाले आहेत.  ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एक हजार 594 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये 12 कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सन 2023-24 अंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील 4 हजार 403 लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तर मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत इतर व विशेष मागास प्रवर्गातील 13 हजार 596 लाभार्थींना मान्यता देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी  पोलीस यंत्रणा सदैव  सक्रीय असते. आपल्या जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, पृथ्वीराज देशमुख सैनिक शाळा धर्मापूरी, जवाहर नवोदय विद्यालय, गांधी विद्यालय, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक वाहन, श्वान पथक, दंगा नियत्रंण पथक,  अग्निशमन दल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे पथक संचलनात सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, उपस्थित नागरिकांची भेट  घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते सन 2023-24 जिल्हा क्रीडा पुरस्कार, शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान, सन 2024-25 या वर्षातील पदक विजेते राष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.

०००