बीडची विकसित जिल्हा अशी ओळख घडवू – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

बीड, दि. २६ (जिमाका): बीड जिल्ह्यात अधिकाधिक सर्वांगीण विकास कामे करून विकसित बीड जिल्हा अशी ओळख प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पोलीस मुख्यालय मैदानावर 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा मंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात पोलिसदल, होमगार्ड, एन.सी.सी. तसेच  स्काऊट गाईड आदींच्या 19 पथकांनी संचलन केले. या परेडचे नेतृत्व बीडचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले. ध्वजारोहणा नंतर भरणे यांनी परेडची पाहणी केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

देशाला पाचवी अर्थसत्ता बनविल्याबद्दल प्रधानमंत्र्याचे त्यांनी आभार मानले. राज्यात ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला आहे. त्याबद्दल त्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. आद्यकवी मुकुंदराज यांच्या जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असे मंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले.

खोखो विश्वचषक जिंकून देणारी बीडची कन्या प्रियंका इंगळे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे बीडचे अविनाश साबळे तसेच राहुल आवारे आणि नवनाथ फरताडे यांचे त्यांनी कौतुक केले.

बीड जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे साकार होत आहे. यामुळे बाजारपेठ जवळ होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यासह सर्वांनाच फायदा होणार आहे असे सांगत मंत्री श्री. भरणे यांनी सेंद्रिय शेती तसेच रेशीम शेतीत जिल्हाला प्रथम क्रमांकावर आणल्याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्यात क्रीडा सुविधासाठी 8 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून माजलगाव, वडवणी, गेवराई, केज, अंबाजोगाई आणि धारूर या 6 ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येईल असेही क्रीडामंत्री यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात होणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी 900 कोटीहून अधिक खर्च करण्यात येत आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसह इतर 51 कामासाठी 321 कोटी 50 लाखांचे कामे प्रगतीपथावर आहेत याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

कार्यक्रमानंतर जिजाऊ मल्टीस्टेट गुन्ह्याचा तपास लावणारे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व तुळशीराम जगताप यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते शहीद जवान पांडुरंग वामन तावरे यांच्या वीरपत्नी गोदावरी तावरे यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला. यावेळी शाळांच्या पथकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पोलीस दलाचे अनिल शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

०००