नाशिक, दि.२६ जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्तसेवा): देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचे योगदान, सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.
भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी पोलिस संचलन मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) विक्रम देशमाने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कार, शहरातील उड्डाण पुलावर द्वारका सर्कल येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेल्या निधीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. मंत्री श्री. महाजन यांनी संचलनाची पाहणी केली. सहाय्यक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने संचलन केले.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, तीन वर्षापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली भव्य- दिव्य प्रमाणात साजरा केला. तेव्हापासून ते भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन २०४७ पर्यंतचा हा २५ वर्षांचा अमृत काळ असणार आहे. या कालावधीत विकसित राष्ट्राचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ही स्वप्नपूर्ती होऊन बलशाली, समृद्ध आणि सशक्त भारताची निर्मिती आणि ‘सबका साथ सबका विकास’करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील.
शेतकरी हा राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ८०२ शेतकऱ्यांना ९०.६४ कोटी रुपयांचा १९ वा हप्ता देण्यात येईल. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा ६ लाख ५७ हजार ५७४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०० टक्के पेरा झाला आहे. जिल्ह्यात ७ मोठे आणि मध्यम १७ सिंचन प्रकल्प आहेत. त्यांच्यात आज अखेर ८१ टक्के जलसाठा आहे. असे असले, तरी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जिल्ह्यात नदी जोड प्रकल्पांना चालना देत सिंचनाचे जाळे व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. शासनाने ग्रामीण रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड वापरण्यास सक्षम करून योजनेने त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वामित्व योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील रहिवाश्यांना होणार आहे. या योजनेमुळे बँक कर्ज, सावकारांवरील अवलंबित्व कमी करणे व अत्याधिक व्याजदरापासून लोकांचे संरक्षण करण्यास करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
सरकारने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. जिल्ह्यात १५ लाख तीन हजार ९२५ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील एक हजार महिलांना पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले असून लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करणे या योजनेच्या धर्तीवर सन २०२३- २०२४ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांची निवड करून त्या शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून विकसित करणारी योजना राबविण्यात आली. सन २०२४- २०२५ मध्ये ५२२ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेत २ हजार ८३५ टन गहू व ३ हजार ३६६ टन तांदळाचे, तर प्राधान्य कुटुंब योजनेत ६ हजार ४६टन गहू, तर ९ हजार ६९ टन तांदळाचे नियतन मंजूर करून दरमहा मोफत वितरण करण्यात येत आहे. शिवभोजन योजनेत एकूण १२४ केंद्रांच्या माध्यमातून १४ हजार ९२६ थाळी वाटपाचा इष्टांक मंजूर आहे.
शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, महिलांचे सक्षमीकरण, मुलांना शिक्षण आणि भुकेल्या व्यक्तीस पोटभर जेवण देण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून विविध उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. राज्यस्तरीय आरोग्य निर्देशांकात नाशिक जिल्हा अग्रस्थानी आहे. सरकारने नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकविले जात आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हा महत्वांकाक्षी योजनेंतर्गत शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये ९ हजार ८१५ उमेदवारांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उमेदवारांना डीबीटीद्वारे १४.५३ कोटी रुपयांचे विद्यावेतन अदा केले आहे.
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत सन २०२४- २०२५ मध्ये ५३ हजार ६५७ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे, तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ६० हजार २४९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १ लाख १३ हजार २२७ महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दीष्ट असून डिसेंबर २०२४ अखेर ६९ हजार ९८७ महिला लखपती झाल्या आहेत. ६५ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणांच्या खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत मदत केली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत ४८ हजार ७१९ अर्ज मंजूर झाले आहेत.
नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन २०२४- २०२५ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत ८१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३२७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत ५२ टक्के निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजनेत ३४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १४६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ८९ टक्के निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेत ३३३ कोटी रुपये प्राप्त झाले असून आतापर्यंत विकास कामांवर ३१२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. कुंभमेळ्यातील विकास कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. आगामी महाकुंभ हा सुरक्षित, स्वच्छ व दुर्घटनारहीत कुंभ करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यांना झाले पुरस्कारांचे वितरण
उत्कृष्ट ध्वजनिधी संकलन (सन २०२३-२४) कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सन्मानित करण्यात आले
केंद्र सरकारच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी केल्याबद्दल एक्सलन्स ॲडमिनिस्ट्रेशन या उपक्रमांतर्गत हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना Police medal for Distinguished service पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण विशेष अभियान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक २०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय, नाशिक येथील सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके, अंकुश चिंतामण यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्याकडून अतिउत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक २०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मान
सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन येवला येथील उमेश बोरसे यांना उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रिय गृहमंत्री दक्षता पथक-२०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मान
वीरपत्नी मनीषा मोहिते यांना एन हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते ऑपरेशन स्नो लिओपार्ड लेह लडाख मध्ये कर्तव्य बजावत असतांना विरमरण आले त्यांचे शौर्यपदक त्यांच्या पत्नी मनीषा माहिते यांना १ कोटी रूपयांचा धनादेश प्रदानØ
कर्नल राकेश माधव बिरार यांना भारतीय सैन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने सेना मेडल देवून सन्मानित केल्याने महाराष्ट्र शासनातर्फे रुपये १ लाख ५० हजार रूपयांचा पुरस्कार
कर्नल विलास सोनवणे यांना सन २०२३-२४ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत पाच कोटी त्रेसष्ट हजार पाचशे सत्यात्तर इतक्या निधीचे वाटप तसेच जिल्ह्याला मागील वर्षी ध्वजनिधी संकलनासाठी रू. १ कोटी ३८ लाख ६७ हजार चे उद्दिष्ट देण्यात आले होते जिल्ह्याने रूपये २ कोटी १७ लाख ४८ हजार इतके उद्दीष्ट साध्य केले.
जल संवर्धनातनू जल समृद्धी वाटचाल या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिक च्या मिशन भागिरथ या संकल्पनेतून नरेगाअंतर्गत सिंमेंट बंधारे / केटी वेअर कामे मोहीम स्वरूपात एकूण ५२६ पैकी ३२७ कामे प्रत्यक्षपणे सुरू करून त्यापैकी ३०८ कामे पूर्ण करण्यात आल्याने जिल्हा परिषद नाशिकला राष्ट्रीय स्तरावर स्कॉच पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सन्मानित करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गटातील मोडाळे ग्रामपंचायतीलस पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात १६ डिसेंबर २०२४ पासून सुरू असून, त्याद्वारे शेतकरी त्यांच्या शेताची माहिती आधार क्रमांकाशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याचा ओळख क्रमांक (Farmers ID) तयार करण्यात येत आहेत. प्रातिनिधीक स्वरूपात सहा शेतकऱ्यांना आयडी वाटप करण्यात आले. यात सुभाष पोपटराव देशमुख,आंबेबहुला, पंढरीनाथ कचरू चव्हाण, विल्होळी, राजराम कारभारी मते, शिंदे, सुरेश महादू चौधरी, पळसे, मनिष चंद्रकांत पवार, मोहगाव, विजय केरू आडके, नाणेगाव.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र
तृप्ती दत्तात्रय सोनवणे, पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्तालय,नाशिक
मनिषा सुरेश कांबळे, महिला पोलीस अमलदार, पोलीस आयुक्त
पुष्पा चंद्रकांत आरणे, सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
विजया प्रकाश पवार, उप. निरिक्षक पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
समाजकल्याण कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागातर्फे वीरपत्नी मनिषा संदिप मोहिते, कर्नल राकेश माधव बिरार, कर्नल विलास सोनवणे यांचा सत्कार
पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस ठाणे/ शहर वाहतूक शाखा/ इतर विभाग शाखा येथील बीट मार्शल कर्तव्य, ११२ गस्त, समन्स, टपाल कर्तव्य करीता निकामीकरण झालेल्या वाहनांचे बदली सन २०२४-२५ मध्ये एकूण ६२ होंडा शाईन, १२५ सीसी गाड्यांचे वाटप करण्यात आले
आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी मिनी फायर अँण्ड रेसेक्यू व्हेईकल नगरपालिका / नगरपरिषद मनमाड, ओझर व सिन्नर यांना वाटप करण्यात आले.
१२ जानेवारी २०२५ रोजी नाशिक-मुंबई महामार्गावर द्वारका उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदयांनी मृताच्या वारसांना प्रत्येकी रूपये 5 लाख प्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर केले त्या अनुषंगाने मृतांच्या वारसांना रकमेच्या धनादेशाचे वाटप जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले.
१. कै. यश उर्फ शिवम चंद्रकांत खरात, वय १७ वर्षे यांची आई अनिता चंद्रकांत खरात यांना धनादेश प्रदान
२. कै. संतोष तुकाराम मंडलिक, वय ५५ वर्षे यांची पत्नी दीपाली संतोष मंडलिक यांना धनादेश प्रदान
३. कै. अतुल संतोष मंडलिक, वय २२ वर्षे यांची आई दीपाली संतोष मंडलिक यांना धनादेश प्रदान
४. कै. विद्यानंद समाधान कांबळे, वय १७ वर्षे यांचे वडील समाधान बाणाजी कांबळे यांना धनादेश प्रदान
५. कै. राहुल प्रभाकर साबळे, वय १८ वर्षे यांची आई वर्षा प्रभाकर साबळे यांना धनादेश प्रदान
६. कै. अनुज सुनील घरटे, वय १६ वर्षे यांची आई मधुमती सुनील घरटे यांना धनादेश प्रदान
७. कै. दर्शन सुनील घरटे, वय १७ वर्षे यांची आई मधुमती सुनील घरटे यांना धनादेश प्रदान
८. कै. आरमान शाहरूख खान, वय १६ वर्षे यांची आई अफसाना शाहरूख खान यांना धनादेश प्रदान
९. कै. चारूदत्त उर्फ चेतन पवार, वय १६ वर्षे यांचे वडील दिनेश रघुनाथ पवार यांना धनादेश प्रदान
यावेळी शायनिंग स्टार इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मेरा रंग दे बसंती’ नवरचना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘अलवारी पे सर’ या देशभक्तीपर गीतावर नृत्ये सादर केली. भोसला मिलिटरी स्कूच्या विद्यार्थ्यांनी अश्व दलाच्या कसरतीचे सादीकरण केले. विश्व जिज्ञासा स्पोर्टस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली.
000