भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

रायगड जिमाका दि.२६–  भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या शानदार संचलन द्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात  पोलीस दल पुरुष, महिला, गृहरक्षक दल, वाहतूक विभाग दुचाकीस्वार,  वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका, अंमली पदार्थ शोधक, श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर सविता गर्जे यांनी केले.

यावेळी शुभेच्छा देतांना कु. आदिती तटकरे यांनी सांगितले राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरू झाला असून महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये, महाराष्ट्राचे १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे. थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती देण्यात येते. नुकत्याच दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने अधिक विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा म्हणून रायगडने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. औद्योगिकीकरण आणि पर्यटनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे.

महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नवे जाळे या परिसरात विणले जात आहे. आज जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक औद्योगिक प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातून ३ लाखांहून अधिक लोकांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.येत्या काळात नवी मुंबई विमानतळ, गेल, आरसीएफ,  जेएसडब्लूच्या प्रकल्पांचा विस्तार होणार आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या कक्षा अधिक रुंदावणार आहेत. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला पोषक वातावरण आहे. पायाभूत सुविधाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. भविष्यात रायगड जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास वाटतो असे सांगून त्या म्हणाल्या  राज्याच्या निर्यात  क्षेत्रात जिल्ह्याचा वाटा ९.३ टक्के आहे. निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे ५ लाख ५६ हजार कोटी एवढे योगदान असून त्यात जिल्ह्याचे ५२ हजार कोटीचे योगदान आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाला असलेले महत्त्व आज डेटाला प्राप्त झाले आहे. डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबई बनले आहे. जेएनपीटी आणि दिघी पोर्टमुळे रायगडमध्ये फायनान्शिअल इकोसिस्टिम तयार झाली आहे असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

रायगडमधील जलवाहतुकीचे नियोजन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या बंदरांच्या विकासाचे नियोजन केले होते. रेवस बंदराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला होता. रायगडमधील करंजा बंदराच्या विकासाबरोबरच करंजा ते रेवस यादरम्यान रो-रो बोट सेवा सुरु करण्यास  सरकारने मान्यता दिली आहे. करंजा बंदरावर ही सेवा सुरू करण्यासाठी यापूर्वी १९ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रेवस बंदरावरही अशीच कामे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर रायगडमधील सावित्री नदीवरील दासगाव येथे नवीन पूल बांधण्यासाठी, तसेच दादली पुलाजवळ नवीन पुल उभारण्यासाठी जवळपास १४० कोटी रुपयांचा निधी  सरकारने उपलब्ध करून दिला आहे.

अलिबागला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या सांबरकुंड धरणासाठी  तातडीने बैठक आयोजित करून या प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे सांगून कु तटकरे म्हणाल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायती मधील १८३० गावांपैकी १५४५ गावे मॉडेल व्हिलेज झाली आहेत.

रायगडमधील मासेमार कुटुंबाच्या कल्याणासाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष विमा आणि डिझेल अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसान भरपाईसाठी धोरण प्रथमच घोषित केले. अशाप्रकारचे धोरण राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यायी इंधनाचा स्रोत म्हणून बांबूची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ‘मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती दलाची’ स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर हरित आच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात ५ कोटी बांबू रोपे तयार करण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून कार्यवाही सुरु आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदी साठी पुढाकार घ्यावा. आपले सर्व सण, उत्सव पर्यावरण पूरक साजरे करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपली सर्व गावे, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे हि स्वच्छ, सुंदर ठेवावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केली.

राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” राबवित आहे. या योजनेंतर्गत,  जुलै ते जाने २०२५ पर्यंत सात मासिक हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. ही योजना अशीच यापुढेही चालू राहील.अशी मंत्री कु. तटकरे यांनी ग्वाही दिली.

शासन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.  आपण सर्वानी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा. असे आवाहन कु. तटकरे यांनी या निमित्ताने केले.

बेटी बचाव बेटी पढाव ही प्रतिज्ञा

यावेळी बेटी बचाव बेटी पढाव ही प्रतिज्ञा मंत्री कु तटकरे यांनी उपस्थिताना दिली. प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे मुलगा मुलगी यांना समान मानेल. स्त्री भ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन. बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीते साठी सदैव प्रयत्नशील राहीन.

तसेच यावेळी बेटी बचाव बेटी पढाव संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेल्या फलकावर मंत्री आणि अन्य मान्यवरांनी स्वाक्षरी करून संदेश दिला.

भारतीय संविधान उद्देशिका प्रतीचे वितरण

घरघर संविधान निमित्ताने प्रातिनिधीक स्वरुपात संविधान उद्देशिका प्रतीचे वितरण मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड डॉ. भरत बास्टेवाड पोलिस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांना करण्यात आले.

विविध पुरस्कार व सत्कार समारंभ

सर्वोत्कष्ट गुन्हे तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक २०२३ हे जाहीर करण्यात आल्या बद्दल अपर पोलीस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथरे यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

गुणवंत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील एक बहुउद्देशिय पुरूष कर्मचारी व पनवेल महानगरपालिके अंतर्गत एक कर्मचारी अशा १६ गुणवंत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

लेक लाडकी योजना लाभार्थी

अन्वी नितिकेश पाटील

(ग्रामपंचायत नाव – भाल) आणि शिवन्या अविनाश पिंगळे

(ग्रामपंचायत नाव – ताडवागळे)यांना धनादेश वितरण करण्यात आले.

कुष्ठरोगा संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली (GIS Atlas) पुस्तकाचे प्रकाशन

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, पनवेल नवी मुंबई व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या कुष्ठरोगा संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली (GIS Atlas) पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतुन रायगड पोलीस दलास देण्यात आलेल्या वाहनांचे व ड्रोन चे हस्तातरण यावेळी मंत्री कु तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमानंतर  मंत्री कु. तटकरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

0000