कोल्हापूर, दि.२६ (जिमाका): विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती करीत आहे. नैसर्गिकरित्या विपुल साधनसंपदेनं नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत लवकरच होईल, असा विश्वास व्यक्त करुन सर्वजण मिळून जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करुया, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथे मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच क्षयमुक्त भारताची शपथ पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘कोल्हापूर पर्यटन’ पुस्तिकेचे अनावरण पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारा ऑलिंपिकमध्ये कास्यंपदक विजेता व केंद्र सरकारच्यावतीने सन 2024-25 या वर्षातील अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वप्नील कुसाळे तर दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड कप खो-खो क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या कुमारी वैष्णवी बजरंग पवार यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान कुटुंबियांनी स्वीकारला.
यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सारथीच्या सहव्यवस्थापक संचालक किरण कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय व इतर मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
देशाच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरकरांचे मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्या पदपावन स्पर्शाने व विचारांनी घडलेला, त्यांच्या वैचारिक मांडणीतून उभा राहीलेला असा कोल्हापूर जिल्हा आहे. पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेला कोल्हापूर जिल्हा येत्या काळात विविध विकास आराखड्यांमधून देशात अग्रस्थानी नेण्याचा मानस आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधून सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी योगदान देण्यात येईल.
कोल्हापूर जिल्ह्याची ओळख पर्यटन जिल्हा म्हणून सर्वदूर आहेच. यातून प्रगतीचा आणि विकासाचा नवा मार्ग सुरु होण्यासाठी येत्या काळात नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा अनेक लोकहिताच्या योजनांबरोबरच मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा, 7 कलमी कार्यक्रम अशा उपक्रमांच्या माध्यमातून लोकहिताला प्राधान्य देण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत 576 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. तसेच येत्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक असणारा निधी प्राधान्याने आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर येथे कोल्हापूर इंटरनॅशनल कन्वेन्शन सेंटर उभारण्यासाठी नुकताच निधीही मंजूर झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा व आजूबाजूच्या डोंगर परिसरातील गावांच्या विकासाचा आराखडा सादर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2024-25 साठी भरीव तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यात 1 हजार 482 लाभार्थी असून राज्यात अनुदान वितरणात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी 117 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून सन 2023-24 मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या सर्व शासकीय निवासी शाळा व सर्व शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने नुकतेच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवून एक चांगला आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्माण केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
अर्जून पुरस्कारप्राप्त स्वप्नील कुसाळे याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील युवकांनी जिल्ह्याची मान उंचविण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी शासन येथील क्रीडा सुविधांमध्ये वाढ करीत आहे. अद्यावत शुटींग रेंज तयार करण्यात आली आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्रात आवश्यक सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. 3 हजार 200 कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक वित्तसहाय्य करणार आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी शासनामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात पी.सी.पी.एन.डी.टी. तसेच एम.टी.पी. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. शेंडा पार्क येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्व सोयींनीयुक्त तयार होत आहे. येथील नवीन बांधकाम, इमारतींचे नुतनीकरण, परिसरातील रस्त्याची दुरुस्ती, आंतर्बाह्य सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार असून ही बाब विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन कल्याणाच्या दृष्टीने उपयोगी आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यात ६ तालुक्यात 6 निर्भया पथके स्थापन करण्यात आली असून या पथकाकडून महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीवर, तसेच शाळा, कॉलेज व इतर ठिकाणी बेदरकारपणे भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या मोटर सायकलस्वारांवर कारवाई केली जात आहे.
केंद्र सरकारच्या डिजीटल पब्लिक इन्फ्रास्टक्चर फॉर ॲग्रीकल्चर अंतर्गत ॲग्रीस्टॅक हा प्रकल्प संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना यातून शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक हा मुलभूत घटक ठरणार आहे. जिल्ह्यामध्ये ६ हजार ४१५ नागरी सुविधा केंद्रामध्ये ही कार्यवाही करण्यात येत आहे. आज यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात ओळख क्रमांकाचे वाटपही याठिकाणी होत आहे.
शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविणे हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या अभिनव उपक्रमांव्दारे नागरिक व प्रशासन यांच्या दरम्यान ठोस नातंही निर्माण होईल. जिल्हा प्रशासनाने घरपोच सेवा, सेवा वाहिनी, आपले सरकार वेब पोर्टल आरटीएस मोबाईल ॲप्लिकेशन, व्हाट्सॲप चॅटबॉट, प्रत्येक तालुक्यात एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, लोकांच्या तक्रारीसाठी सुरु केलेली क्युआर कोड संकल्पना तसेच कार्यालयांचं मानांकन इत्यादी घटकांमधून प्रशासन गतीमान करण्याचे नियोजन आहे. महसूल प्रशासनाने जानेवारी २०२५ अखेर नागरिकांना १ लक्ष विविध दाखले देण्याचा उपक्रम हाती घेतला असून सर्वांच्या प्रयत्नांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
‘कोल्हापूर पर्यटन’ पुस्तिकेचे अनावरण
जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर आधारित तयार करण्यात आलेल्या ‘कोल्हापूर पर्यटन’ पुस्तिकेचे अनावरण पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असणाऱ्या विविध पर्यटनस्थळांची माहिती व आकर्षक छायाचित्रे या पुस्तिकेत देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पानावर क्यूआरकोड देण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्या-त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग व अंतर पाहता येईल.
यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी, तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारस, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस, माजी सैनिक, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाचा शेवट झाला.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान
उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारा ऑलिंपिकमध्ये कास्यंपदक विजेता व केंद्र शासनाच्यावतीने सन 2024-25 या वर्षातील अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वप्नील कुसाळे तर दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड कप खो-खो क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या कुमारी वैष्णवी बजरंग पवार यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान कुटुंबियांनी स्वीकारला.
पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरीबाबत मा. राष्ट्रपती महोदय यांचे गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक प्राप्त पोलीस अंमलदार आयुबखान मुल्ला यांचा सन्मान करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेमार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या शिक्षकांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेमार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी युवा व्यक्तीमहत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षामध्ये सर्वाधिक प्रशिक्षणार्थ्यांना लाभ दिल्याबद्दल केंद्र चालकांचा सन्मान करण्यात आला. सहायक संचालक इतर मागास बहूजन कल्याण कोल्हापूर, महाज्योती, नागपूर इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर ॲग्रीस्टॅक योजना अंमलबजावणी – शेतकरी माहिती संज निर्मितीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद नोंदिविल्याबाबत सन्मानपत्र प्रदान केले.
कोल्हापूर महानगरपालिका अग्नीशमन विभागातील विविध वर्दीवर व स्पेशल कॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वाहनचालक व फायरमन यांचा सन्मान तसेच कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या टेंबलाईवाडी विद्यालयाचे शालेय विद्यार्थी व शिक्षण विभाग (माध्यमिक) शालेय पद्माराजे गर्ल्स हायस्कूल 250, एस.एम. लोहिया 250 व न्यू हायस्कूल 250 असे एकूण 750 विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला.
०००