क्रीटीकल केअर युनिटच्या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात
रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : २४ कोटी रुपये खर्चून क्रीटीकल केअर युनिट रत्नागिरीमध्ये होत आहे. या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात होत आहे. घराघरात आरोग्याची सुविधा पोहचविण्यासाठी ‘हॉस्पीटल ऑन व्हील’ ही संकल्पना सुरुवात करणार आहे, असे आश्वासन देतानाच प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून कुठेही बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
येथील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इंन्फ्रास्ट्रक्चर मिशन (पीएम अभीम) क्रीटीकल केअर युनिटच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अधिष्ठाता डॉ. रामानंद जयप्रकाश वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संघमित्रा फुले, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आरोग्याच्या सुविधा निर्माण करताना चांगल्या इमारती हव्यात. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सीसीयूमुळे मदत होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कॅशलेस हॉस्पीटल रत्नागिरीमध्ये सुरु आहे. लवकरच हॉस्पीटल ऑन व्हील ही संकल्पना जिल्ह्यात आणणार असून, त्यामाध्यमातून घराघरात आरोग्याच्या सुविधा पोहचविल्या जातील. डॉक्टरांनी रुग्णांवर हसत हसत उपचार केले पाहिजेत.
प्रादेशिक मनोरुग्णालय आंतरराष्ट्रीय स्तरावर
काही महिन्यांपूर्वी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका रशियन महिलेच्या मानसिकतेवर उपचार करण्यात आले. घरच्यांपेक्षाही चांगले उपचार इथे आल्यावर रुग्णांवर होतात. या महिलेवरही तसे उपचार झाल्यानंतर तिला तिच्या कुटुंबाकडे पाठविण्यात आले. एका अर्थाने हे प्रादेशिक मनोरुग्णालय आंतरराष्ट्रीय पोहचविण्याचे काम केले आहे. त्याबद्दल डॉ. फुले यांना धन्यवाद देतो, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत यांनी हे प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातच राहणार आहे. ते कोणत्याही जिल्ह्यात हलणार नाही, अशी ग्वाही दिली. शासकीय कार्यालयांबरोबरच शासकीय रुग्णालये त्याचा परिसर, विशेषत: शौचालये, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ती जबाबदारी प्रत्येकांनी पार पाडावी, असेही ते म्हणाले.
000