पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव 2025 च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे, ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहेत. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडीत जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची शर्यत, डॉग शो पाहिला व यातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरीत केली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण केले.
०००