लातूर, दि. २६ : राज्य शासनामार्फत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांना ४२ चारचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ही वाहने संबंधित विभागांना सुपूर्द करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित या कार्यक्रमामध्ये पोलीस विभागाच्या अभया सुरक्षित प्रवास योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेल्या वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महसूल विभागाला ९, जिल्हा परिषदेला ८, लातूर शहर महानगरपालिकेला १ आणि पोलीस विभागाला २४ वाहने राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत. महसूल, जिल्हा परिषद विभागाला मिळालेली वाहने जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना सुपूर्द करण्यात आली. लातूर शहर महानगरपालिकेला एक अग्निशमन वाहन, तसेच पोलीस दलातील विविध पथके, अधिकारी यांच्यासाठी २४ वाहने प्राप्त झाली आहेत.
अभया सुरक्षित प्रवास योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेल्या वाहनांना हिरवा झेडा
लातूर शहरातील महिला, बालक व वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित, कोणतीही भीती न बाळगता प्रवास करता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाने अभया सुरक्षित प्रवास योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे प्रवाशांना ऑटो रिक्षावर, सिटी बसमध्ये लावण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून तत्काळ पोलीस मदत मागवता येईल. याद्वारे मदत मागताना लोकेशन पाठविण्याची सुविधा असल्याने लवकर मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेली सिटी बस, ऑटोरिक्षाला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मराठवाड्यात अशी योजना राबविणारा लातूर हा पहिलाच व राज्यात दुसरा जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
0000