वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘कॅप्टीव्ह मार्केट’ योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ

राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ

जळगाव दि. 27,( जिमाका ) कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज 27 जानेवारी रोजी संपन्न झाला.

याप्रसंगी तालुक्यातील 10 अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलाना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते साडी वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाचा पहिला कार्यक्रम भुसावळ येथे संपन्न होत असून लाडक्या बहिणींना साडी वितरण करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. त्यामुळे कापूस संबंधी प्रक्रिया उद्योग या संबंधित विभागाचे मंत्रीपद हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे असल्याने जळगाव व भुसावळ येथे संबंधित उद्योगाच्या वाढीस नक्कीच चालना मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी उपस्थिताना कॅप्टीव्ह मार्केट योजनेबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री खाजगी सचिव प्रल्हाद रोडे, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील , भुसावळ तहसीलदार नीता लबडे ई मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती बडगुजर यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग, विधवा महिला, परितक्ता महिला यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देऊन मान्यवरांचे हस्ते ई- शिधापत्रिकांची वितरण करण्यात आले.