मुंबई, दि.२९ : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या मागण्यांबाबत तसेच व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिले.
मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई दूध योजना केंद्रचालक वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र दूध वितरक सेना यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री.सावे बोलत होते.
मंत्री श्री.सावे म्हणाले,की दूध व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. दूध व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.
या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक व राज्यातील दुग्धशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या समस्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.
या बैठकीस दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000