केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १ (जिमाका) : केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर झाला असून इन्कम टॅक्सची मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. सर्वसामान्य माणसांच्या हिताला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्रीय निधीमधून राज्यातील पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आज ठोस भूमिका घेण्यात आली आहे. देशातील सुमारे 50 नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाची निवास व न्याहारी, होम स्टे ही संकल्पना केंद्र शासनाने उचलून धरली असून मोठमोठे हिल स्टेशन्स, निसर्गरम्य पर्यटन स्थळे यासारख्या ठिकाणी निवास व न्याहारी, होम स्टे योजनेच्या माध्यमातून स्थानिक लोकांना लोकांच्या घरांमध्येच पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्या सारख्या योजनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होत आहे.
पर्यटन क्षेत्राला गती देण्याच्या दृष्टीने ज्या ज्या बाबींचा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये समावेश आहे त्या बाबींसाठी पुढील आठवड्यात पर्यटन विभागाची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या हिस्सेदारीतून कोणत्या योजना राबविण्यात येतील यावर या बैठकीत विचार करण्यात येईल. राज्याच्या पर्यटन क्षेत्र वाढीला केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करण्यात येईल.