जिल्हास्तरीय हिराई व मिनी सारस महोत्सवाचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 1 : चंद्रपूर जिल्ह्यात महिला बचत गटांचे अतिशय उत्तम काम आहे. या बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद विविध उपक्रम राबवित आहे. अशा उपक्रमातूनच महिला आत्मनिर्भर होण्यास हातभार लागणार असून पंतप्रधानांच्या विकसीत भारत संकल्पनेत चंद्रपूरचे निश्चितच योगदान राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने, महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीकरीता चांदा क्लब ग्राऊंड, येथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करतांन पालकमंत्री डॉ. अशोक उईके बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, प्रभारी मुख्य वनसंरक्षक पियुषा जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, गिरीश धायगुडे, नुतन सावंत उपस्थित होते.
देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम प्रशासनाने आयोजित केला असून जिल्ह्यात महिला बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले असून त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे टाकलेले हे एक पाऊल आाहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा सर्वांगीन विकास करण्यासाठी कटिबध्द आहे. महिलांच्या कोणत्याही तक्रारी किंवा अडीअडचणी असतील तर प्रशासनाने त्या त्वरीत सोडवाव्यात. महिलांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे महिला ग्रामसंघ, लखपती दिदी योजनेंतर्गत महिलांचा सन्मान, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी विविध स्टॉल तसेच पशुप्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते बचत गटाच्या व्यापारी संकुलाचे ई-भुमीपुजन करण्यात आले.
प्रास्ताविकेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, पाच दिवसीय या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल, आरोग्य तपासणी, महिलांची कॅन्सर तपासणी, पशुप्रदर्शनी, विविध येाजनांची माहिती देणारे स्टॉल आदी लावण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात महिला बचत गटांना आतापर्यंत 362 कोटींचे वाटप करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख, गटविकास अधिकारी तसेच मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध : प्रदर्शनीमध्ये विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांबपोळी, पुरणपोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तु, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसळीचे तांदूळ, कापडी बॅग, टेराकोटा, गांडूळखत आदींचा समावेश आहे.
००००००