सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत – पालक सचिव विनिता वेद सिंगल

१०० दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा

सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने सातत्याने प्रयत्न करावेत, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्यासह महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग यासह सर्व विभागांनी आपल्या सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करुन द्याव्यात, असे सांगून पालक सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, सर्वसामान्याचे जीवन सुकर होण्यासह त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी तोडगा कसा मिळेल, यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. सामान्य माणसाची कामे अधिक कार्यक्षमतेने करावीत. तक्रारींचे निराकरण वेळीच करावे. सामाजिक आर्थिक सहाय्य योजनांप्रमाणे आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग व अन्य विभागाच्या सामान्य माणसाच्या कल्याणकारी योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. दिव्यांग प्रमाणपत्राच्या अनुषंगाने तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात स्वतंत्र वैद्यकीय पथक ठेवावे, असे त्या म्हणाल्या.

भविष्याचा विचार करता सर्व यंत्रणांनी आपल्या कार्यालयात पर्यावरणीयदृष्ट्या नियोजन करावे. सर्व शासकीय कार्यालये हरित कार्यालये करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगून पालक सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, पर्यावरणीयदृष्ट्या स्थानिक बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धन यावर भर द्यावा. स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, जैविक कचरा व्यवस्थापन आदिंबाबत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरविकास विभागाने विशेष प्रयत्न करावेत. माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवावे, असे त्यांनी सांगितले.

विविध विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वय राखत दूरदृष्टीकोन ठेवून शाश्वत कामे होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून पालक सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, शाळा महाविद्यालयांमधील तक्रारपेटीमधील तक्रारी महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकानेच तपासाव्यात. शाळा, महाविद्यालयात मुली, युवतींना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये, गोदामांच्या ठिकाणी, शाळा सुटण्याच्या वेळेच्या आसपास विशेष पोलिसिंग करावे. दत्तक मूल प्रकरणी प्रलंबित प्रकरणे संबंधित विभागांनी समन्वयाने निकाली काढावीत. पाणंद रस्त्यांसाठी जुन्या नकाशांची मदत घ्यावी. तसेच, नव्या पाणंद रस्त्यांचे ड्रोन मॅपिंग करून घ्यावे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ई सर्व्हिस बुक तयार करावे. शासकीय मालमत्तांचे जिओ टॅगिंग करावे. कार्यालयात सोयी सुविधा व स्वच्छता यासाठी कार्यवाही करावी. अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी 100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण नागरिकस्नेही करणे, सुकर जीवनमान, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण, कार्यालयीन सोयी व सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभागाचा आढावा घेण्यात आला.

महसूल विभागाचे सादरीकरण करताना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत सात कलमी कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या दशसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेचे नाविन्यपूर्ण उपक्रम, माझी वसुंधरा अभियानातील यश, शिक्षण, आवास, पाणीपुरवठा यातील कामगिरी व १०० दिवसीय विशेष कार्यक्रम आदिंचा आढावा सादर केला.

मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी १०० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका करत असलेल्या कार्यवाहीबाबत सादरीकरण केले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलिस विभागाचे सादरीकरण केले. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा वार्षिक आराखड्याबाबतची माहिती सादर केली.

00000