सांगली, दि. ०२ (जिमाका) : गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या रूग्णांवर यापूर्वीही उपचार करण्यात आले आहेत. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ आजाराचा जिल्ह्यातील आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आरोग्य विभागाकडून घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ आदि उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, या आजाराबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सांगली जिल्ह्यात जीबीएसचे आतापर्यंत 9 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 3 व शहरी भागातील 3 रुग्ण असून जिल्ह्याबाहेरील 2 व राज्याबाहेरील 1 रुग्ण आहे. त्यापैकी 4 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गत तीन वर्षात या आजाराचे निदान झालेल्या पैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
दररोजच्या रुग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दररोज न चुकता सायंकाळी अद्ययावत करावी. त्यासाठी रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेने संपर्क अधिकारी नेमावेत, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
०००