जळगाव दि. 03 फेब्रुवारी (जिमाका) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ९५,९५७.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे आरोग्य सेवांमध्ये मोठे सुधार होण्याची शक्यता आहे.
या अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “हे आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहे.”
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ₹9,406 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे गरीब व गरजू लोकांसाठी आरोग्य सुविधा वाढणार आहेत. तसेच, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाला ₹4,200 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत होणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ₹37,226.92 कोटींची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी ₹79.6 कोटींची तरतूद करून डिजिटल मानसिक आरोग्य सेवांना चालना दिली जाणार आहे.
कर्करोग उपचार सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, २०२५-२६ दरम्यान २०० नवीन कर्करोग केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे-केअर कॅन्सर सेंटर्स उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, यामुळे दुर्गम भागांमध्येही उपचार उपलब्ध होतील.
वैद्यकीय शिक्षणासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, पुढील वर्षभरात १०,००० नवीन वैद्यकीय जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांत ७५,००० जागा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या १० वर्षांत १३० टक्के वाढ होऊन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय जागांची संख्या १.१ लाखांवर पोहोचली आहे.
या संपूर्ण अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “ही तरतूद भारताच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरेल. वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढल्याने ग्रामीण भागातील डॉक्टरांची संख्या वाढेल. तसेच, कर्करोग उपचार केंद्रांमुळे हजारो रुग्णांना वेळेत उपचार मिळतील.”
केंद्रीय अर्थसंकल्पातील या तरतुदींचा लाभ महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर मिळेल, असेही महाजन यांनी सांगितले.
000