उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बैठकीत नागपूर विभागासाठी १ हजार ७६३ कोटींचा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आराखडा सादर

नागपूर, दि. 03 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक उमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सन 2025-26 साठी शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत नागपूर विभागाचा 1 हजार 763 कोटी 70 लक्ष रूपयांचा आराखडा सादर करण्यात आला.

याबैठकीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हानिहाय सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनावरही याबैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी पालकमंत्र्यांसह वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार, आमदार जिल्ह्यांचे पालकसचिव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अतिरीक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त नियोजन अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या प्रारूप आरखड्यास जिल्हा नियोजन समितीची शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत मान्यता घेतली आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यासाठी 509.6 कोटी, वर्धा 207.22 कोटी, भंडारा 173.27 कोटी, गोंदिया 198.51 कोटी, चंद्रपूर 340.88 कोटी तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 334.76 कोटी रूपयांच्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक आराखडा सादर करण्यात आला आहे.

नागपूर विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीचा बैठकीस नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईक, गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर (नागपूर), वान्मती शी (वर्धा), संजय कोलते (भंडारा), प्रदिप नायर (गोंदिया), अविशांत पंडा (गडचिरोली) आणि विनय गौडा (चंद्रपूर) आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.