नाशिक, दि. ०३ (जिमाका) : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा दुर्घटनारहीत, सुरक्षित होण्यासाठी गर्दी नियंत्रणाचे सूक्ष्म नियोजन करावे. साधूग्रामसाठी आवश्यक जागेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. चहल यांनी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. चहल म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कामांना गती द्यावी. त्यासाठी सांघिक भावनेने काम करावे. मुख्यमंत्री लवकरच कुंभमेळ्यातील विविध कामांचा आढावा घेणार आहेत. घाट, नदी पात्राची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट याचेही नियोजन करावे. गर्दीच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी करावी. तसेच भक्कम बॅरिकेटस उभारावेत. त्यासाठी संबंधित व्यावसायिकांशी संवाद साधावा. गर्दी नियोजनासाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल का याचीही पडताळणी करीत त्याचेही नियोजन पोलिस दलाने करावे. सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कामांचे प्रस्ताव सादर करावीत, असेही निर्देश डॉ. चहल यांनी दिले.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, कुंभमेळ्यातील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली, तर पोलिस आयुक्त श्री. कर्णिक, महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, पोलिस अधीक्षक श्री. देशमाने यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
०००