मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचा रुग्णांनी लाभ घ्यावा – मंत्री हसन मुश्रीफ  

प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला करणार हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय व गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया

  • जिल्ह्यात होणार मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

कोल्हापूर, दि. ०३ (जिमाका) :  प्रसिद्ध रोबोटिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला यांच्या द्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय कोल्हापूर येथे या शस्त्रक्रिया पार पडणार असून यासाठी संबंधित रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

या अनुषंगाने शेंडा पार्क येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये बैठक पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत सीपीआर येथे या शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या फेजमध्ये 50 शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर रूग्णसंख्येचा विचार करून पुढिल शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. संपूर्ण निशुल्क असलेल्या या शस्त्रक्रियेबाबत संबंधित रुग्णांनी सीपीआर येथील ओपीडी 107, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तथा अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच कोल्हापूर शहरातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात याबाबत आपली नोंदणी करावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही विनाछेद शस्त्रक्रिया असून यामध्ये कुठल्याही प्रकारची शरीराची चिरफाड न करता शस्त्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णांना हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशय याबाबतची शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सल्ला दिला आहे, त्या रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी या मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्याविषयी

डॉ. मुफ्फझल लकडावाला हे डॉ. मुफी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते भारतातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. बॅरिएट्रिक आणि गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल शस्त्रक्रियांमध्ये विशेषज्ञ असून ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि मुख्य शल्यचिकित्सक आहेत. सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, मुंबई येथील जनरल आणि मिनिमल ऍक्सेस सर्जिकल सायन्स विभागाचे शस्त्रक्रिया संचालक आहेत. त्यांच्या 20 हून अधिक वर्षांच्या सरावात त्यांनी 2019 मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर मेटाबॉलिक अँड बॅरिॲट्रिक सर्जरी तर्फे जगातील सर्वोत्कृष्ट सर्जन पुरस्कार आणि इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ द वर्ल्ड मास्टर एज्युकेटर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 हजारांहून अधिक जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

०००