मुंबई, दि. ०५ : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी ‘कॅरी ऑन योजना’ लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एक समानता ठेवावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ई – बैठक झाली. या बैठकीला सर्व विद्यापींठाचे कुलगुरू, कुलसचिव(ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच राज्यभरातील विविध अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येतात, त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी ‘कॅरी ऑन योजनेचा’ उपयोग होतो. मात्र याबाबत सर्व विद्यापींठाच्या पातळीवर एकसमानता असली पाहिजे. यासाठी कालबद्ध नियोजन करावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ‘कॅरी ऑन योजनेच्या माध्यमातून’ विद्यार्थ्यांना या वर्षासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/