- शहरातील स्वच्छतेला, चांगल्या सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना
- जिल्हा परिषदेच्या बाळंतविडा उपक्रमांचीही घेतली दखल
लातूर, दि. ०५ (जिमाका) : गंजगोलाई हे लातूरचे ऐतिहासिक वैभव असून गंजगोलाईला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर नियतव्ययापेक्षा अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय बनसोडे, जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
गंजगोलाईकडे जाणारे रस्ते आणि परिसराचे सुशोभीकरण करताना या वास्तूचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून त्यानुसार आराखडा तयार करावा. या आराखड्यात समाविष्ट कामे गंजगोलाईचे ऐतिहासिक स्थान अधोरेखित करणारी, या वास्तूला साजेशी आणि दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी केल्या. लातूर शहर आणि शहराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात. समन्वयाने काम करून शहर स्वच्छ राहील, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून गर्भवती महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बाळंतविडा’ उपक्रमाचाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी माहिती घेतली. तसेच उपक्रम चांगला असून पात्र आणि गरजू महिलांना चांगल्या दर्जाच्या वस्तू, साहित्य यामाध्यमातून उपलब्ध होईल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
लातूर जिल्ह्यात विद्युत रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्युत भार वाढल्याने नादुरुस्तीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधीची गरज आहे. यासोबतच ऐतिहासिक वारसा असलेल्या गंजगोलाई परिसरातील रस्ते विकास आणि सुशोभीकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केली. वाढीव निधी मिळाल्यास ‘बाळंतविडा’ कीटमध्येही आणखी काही वस्तूंचा समावेश करता येईल, असे ते म्हणाले.
महानगरपालिका हद्दीच्या लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी समन्वय करून कार्यवाही करावी, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता, कृषि संलग्न सेवा, पशुसंवर्धन, शाळा, अंगणवाडी इमारती, गाव तिथे स्मशानभूमी आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे यांनीही जिल्ह्यातील विविध मागण्या यावेळी मांडल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सन २०२४-२५ अंतर्गत आतापर्यंत झालेल्या निधी खर्चाची आणि सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांची माहिती दिली.
०००