नवीन ऊर्जा स्रोतांच्या विकासाबरोबरच वीज वितरणातील सुधारणांवर भर द्या – उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

उर्जा विभागाच्या कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. ५ : राज्यात आगामी काळात नवीन ऊर्जा स्रोतांचा विकास, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि वीज निर्मितीमध्ये सुधारणांवर विशेष भर देण्यात यावा असे निर्देश उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एचएसबीसी फोर्ट, मुंबई येथे आयोजित उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, संचालक संजय मारुडकर, अभय हरणे, बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक राजेंश पाटील, पंकज नागदेवते, नितीन चांदुरकर उपस्थित होते.

उर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. राज्यात सौर आणि पवन ऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढवून प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मितीला गती देण्यात यावी. शेती, उद्योग, व्यापार वापरासाठी वीज आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळेल यावर विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

राज्यातील विविध उर्जा प्रकल्प, निर्मितीच्या व्यवस्था आणि वीज मागणी यांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

राज्यातील ऊर्जा निर्मिती, साठवणूक आणि वितरण यंत्रणांसह वीज निर्मिती केंद्रे, नवीन प्रकल्प, सौर व पवन उर्जा विकास योजना आणि औद्योगिक वसाहतींसाठी वीज पुरवठ्याच्या गरजा याविषयीही चर्चा झाली.

राज्यातील वीज उत्पादन क्षमता, मागणी-पुरवठा तफावत, भार नियमन धोरणे आणि नवीन प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. अपूर्ण वीज प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही यावेळी चर्चा झाली.

०००

राजू धोत्रे/विसंअ/