मुंबई, दि. ०५: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
या तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन
या महोत्सवात कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिध्दी देण्यात येईल. यासह महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचप्रमाणे, स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहलीचे आयोजन , पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी, पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.
तीन दिवसीय महोत्सवाची वैशिष्ट्ये
स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग,स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी,पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, जलक्रीडा, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे,स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन,स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन,महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
महाबळेश्वरनजिक अन्य पर्यटन स्थळे
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रासपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारी दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतीची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदीरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे.
निवासव्यवस्था आणि उपक्रम
पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.
परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम
भागधारक, ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे, पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, व्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमही पार पडेल. महाबळेश्वरची संस्कृती, सौंदर्य आणि साहस अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव हा परिपूर्ण उपक्रम आहे.
०००
संध्या गरवारे/विसंअ/